लातूर जिल्ह्यातील अनेकजण शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात आहेत. तिथे गेल्यानंतर वाहन चालविण्यासाठी परवाना आवश्यक असतो. त्यामुळे इथूनच परवाना काढून नेला जातो. इथल्या परवान्यावर त्याठिकाणी कोणतीही अडचण येत नाही. परंतु, हा परवाना केवळ वर्षभराचा होता. हा परवाना देत असताना पासपोर्ट, व्हिसा, वाहन परवाना आदींची पडताळणी केल्यावर त्यास प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी परवानगी देतात. ही सोय आता ऑनलाईन पद्धतीने एका दिवसात पूर्ण हाेणार आहे. मुदत संपल्यास भारतीय दूतावासात अर्ज केल्यास त्याचे नूतनीकरणही करता येणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करणे शक्य झाले आहे. यासाठी फक्त भारतीय दूतावासात जाऊन याबाबतची प्रक्रिया परवानाधारकांना पूर्ण करावी लागणार आहे. येथील प्रक्रिया पूर्ण झाली की परवान्याचे नूतनीकरण होणार आहे.
असा काढा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना...
वाहन परवाना काढण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली आहे. हा परवाना आवश्यक असलेल्यांना सारथी संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करता येईल. आपल्याकडे असलेला वाहन परवाना, पासपोर्ट, व्हिसा जोडून प्रक्रिया करता येणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असली तरी कागदपत्रांची पडताळणी करूनच वाहन परवाना दिला जातो. एक हजार रुपये शुल्कासह कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर प्रक्रिया पूर्ण होते.
कोण काढतो हा वाहन परवाना...
जे लोक परदेशात नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने जातात. त्यांना त्याठिकाणी वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक असतो. त्यामुळे अनेकजण स्थानिक परिवहन कार्यालयातून परवाना काढून घेतात. त्याची मुदत एकच वर्षाची असते. केवळ नोकरी, व्यवसायासाठी जाणारेच नव्हे तर शिक्षणासाठी गेलेले तरुणही हा परवाना घेतात. दूतावासातून नूतनीकरणाची सुविधा झाल्याने सोय होणार आहे.
पडताळणी करून दिला जातो परवाना...
आंतरराष्ट्रीय वाहन परवाना देताना संबंधितांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. शासन नियमानुसार प्रक्रिया करावी लागते. आजवर वर्षभराचाच परवाना दिला जात होता. संबंधित व्यक्तीला नूतनीकरणासाठी कार्यालयातच यावे लागत होते.
- विजय भोये, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर