उदगीर : उदगीर ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी एका आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून पोलिस ठाणे हद्दीतील ६ घरफोड्या उघडकीस आणून १४ लाख ६३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल शुक्रवारी जप्त केला.
उदगीर ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यात तपास करीत असताना ३१ जानेवारी रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्याला एकजण आढळून आला. त्याला पोलिसांनी हटकले असता त्याने त्याच्या ताब्यातील दुचाकी सोडून घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून संबंधित व्यक्ती कुठे राहतो, याचा तपास केला असता तो कर्नाटकातील बेंगलोर येथील हणमंत लक्ष्मण लष्करे असल्याची माहिती मिळाली.त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोठा भाऊ अंकुश लक्ष्मण लष्करे पुण्यात राहतो, अशी माहिती दिली.
ग्रामीण पोलिसांचे पथक तपासासाठी पुणे येथे गेले असता अंकुश लष्करे हा डोंबिवली भागात बहिणीकडे राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा गणवेश परिधान करून त्याठिकाणी अंकुश लष्करे यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता उदगीर ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील ६ घरफोड्या उघडकीस आल्या. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाखाची दुचाकी व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १४ लाख ६३ हजार २०० रुपयाचा एवज जप्त केला. पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सुनील भिसे, राम बनसोडे, नामदेव चेवले, राजकुमार देवडे, सचिन नाडागुडे, राजकुमार देबेटवार या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कामगिरी बजावली.