लातूर : समाजात आज घटस्फोटांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी अन्य विविध कारणांसोबत कुठेतरी स्त्री-पुरुष भेदभाव हे ही एक प्रमुख कारण पुढे येत आहे. ते होऊ नयेत यासाठी सामाजिक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या. सुनीता कंकनवाडी यांनी केले.
वीरशैव लिंगायत समाज पुनर्विवाह परिचय मेळाव्याच्या ‘मोबाईल अॅप’ उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. वर्षा दरडे, प्रा. प्रभाताई वाडकर, डी. एन. पत्रवाळे, उमाकांत कोरे, विश्वनाथ आप्पा निगुडगे, बालाजी पिंपळे, गिरीजाप्पा मुचाटे, दीपक वांगसकर, नागेश कनडे, रामदास भोसले तसेच वीरशैव समाज कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती यांनी गुगल मीटद्वारे उपस्थिती दर्शविली होती.
न्या. कंकनवाडी यांनी पुनर्विवाह समाजासाठी आवश्यक आहेत. त्यासाठी समाजाकडून होणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. सोबतच वाढणारे घटस्फोट ही एक नवी समस्या बनली आहे. त्यावर समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विवेक जानते यांनी पुनर्विवाह परिचय मेळावा ही एक निरंतर प्रक्रिया असून, त्यासाठी समाजाने मोबाईल अॅप विकसित केले आहे. या माध्यमातून पुनर्विवाह परिचय मेळावा हा निरंतर सुरू राहणार असल्याचे सांगितले. डॉ. दरडे यांनी सामाजिक समतोल राखण्यासाठी पुनर्विवाह गरजेचे असल्याचे सांगितले.