देवणी तालुक्यातील जवळगा ग्रामपंचायतीच्या वतीने आपलं गाव आपली जबाबदारी, मास्क वापरा, गाव वाचवा ही संकल्पना प्रभावीपणे राबविली जात आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या पथकाने गावास भेट देऊन पाहणी केली आणि कोरोनाचा आढावा घेतला. यावेळी सरपंच हनुमंत बिरादार यांनी गावात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. गावात २१ बाधित गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. या प्रत्येकांची दररोज ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्त्यांकडून गृहभेट देऊन त्यांच्या शरीराचे तापमान, ऑक्सिजन तपासणी करून औषधोपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीसाठी ग्रामपंचायतीने नियोजन करावे, अशा सूचना केल्या. बैठकीस जि. प. सदस्य प्रशांत पाटील-जवळगेकर, सरपंच हनुमंत बिरादार, कृष्णा बोडके, संतोष बिरादार, आशा कार्यकर्ती अनिता लाडकर, आशा गायकवाड, कल्पना टोपे, संगीता जाधव, ग्रामविकास अधिकारी विनोद खरात, आदी उपस्थित होते.
नियमांचे पालन करावे...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्कचा वापर करावा. प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. जवळगा येथील आरोग्य उपकेंद्रात दर मंगळवारी लसीकरण सुरू असून, पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सरपंच हनुमंत बिराजदार यांनी केले.