- राजकुमार जाेंधळेलातूर - पुण्यातील खराडी परिसरात थरारक खून करून पसार झालेल्या पाच अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात लातूरच्या एमआयडीसी पोलिसांना मोठे यश आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लातुरात गस्त घालणाऱ्या ‘चार्ली’ पथकाच्या सतर्कतेमुळे हा उलगडा झाला असून, आरोपींना अटक करून पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा १ वाजेपर्यंत सुरु हाेती.
पाेलिसांनी सांगितले, रविवार, २५ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे चार्ली भांबरी चौक ते साई नाका रिंगरोड दरम्यान पेट्रोलिंग करत होते. यावेळी एचपी पेट्रोल पंपासमोर झाडाखाली १८ ते २० वयोगटातील पाच तरुण संशयास्पद रितीने बसलेले आढळले. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. परिणामी, पोलिसांचा संशय अधिक बळकावला. त्यांच्या मुसक्या आवळत पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, डीवायएसपी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. समाधान चवरे, अंमलदार तुळशीदास घडे, विजय जाधव, भीमराव बेल्लाळे, सचिन कांबळे, राजाभाऊ मस्के, अक्षय डिगोळे, सिद्धेश्वर टोंपे यांच्या पथकाने केली.
व्हॉट्सॲप ग्रुपवर फोटो टाकताच गुन्ह्याचा उलगडा...चार्ली पथकाने तातडीने या पाचही तरुणांचे फोटो पुणे पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवले. अवघ्या काही वेळातच धक्कादायक माहिती समोर आली. हे पाचही तरुण २४ जानेवारी रोजी पुणे शहर हद्दीतील खराडी भागात एका तरुणाचा निर्घृण खून करून फरार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर पुणे येथील वाघोली पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १०३ (१) (खून) आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या पाच आराेपींच्या आवळल्या मुसक्या....लातूर एमआयडीसी पाेलिसांच्या चार्ली पथकाने कैलास विठ्ठल राठोड, गणेश चंद्रकांत कट्टे, सुशील सुभाष कदम (तिघेही रा. खराडी, पुणे), करण विठ्ठल तुरे (रा. चंदन नगर, पुणे) आणि रोहित विकास गायकवाड (रा. नानापेठ, पुणे) यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
लातूरच्या पाेलिसांनी आराेपींना घातला वेढा...पाेलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत वेढा घालून पाचही आरोपींना ताब्यात घेतले. पुणे पोलिसांचे पथक लातुरात धडकताच सर्व पाच आरोपींना पुढील तपासासाठी त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. - - समाधान चवरे, पाेलिस निरीक्षक, लातूर