औसा पालिकेच्या वतीने आयोजित विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, आ.विक्रम काळे, नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, सक्षणा सलगर, श्रीकांत सूर्यवंशी, अल्पसंख्यांक आघाडीचे रशीद शेख, नारायण आबा लोखंडे, माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, नगरसेवक भरत सूर्यवंशी, जावेद शेख यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, शहर सुंदर व स्वच्छ करण्यासाठी नेता खंबीर, विकासाचा उल्हास असणारा असावा लागतो. नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांनी विकासाच्या माध्यमातून औसा शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम केले आहे. शहरात दोन जलकुंभ, आरो प्लांट व पाण्याचे एटीएम, तलावात बोटिंग, तसेच शहरातील मुक्तेश्वर व जमालनगर तलावाचे सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. डॉ.अफसर शेख यांनी शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही ते म्हणाले.