यावेळी छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला. दूध डेअरी आणि डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन बँकेसमोरील तसेच बँक कॉलनी मार्गावरील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात हटविण्यात नगरपालिका प्रशासनाला यश आले. बँक कॉलनी मार्गावर मच्छी, कोंबडी विक्रीची उघड्यावर दुकाने मांडण्यात आल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अगोदरच नगरपालिकेने या रस्त्यावर दुभाजक केल्याने दोन्ही बाजूंचे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच दुकानदाराने अतिक्रमण करून रस्त्यावर आपली दुकाने आणली होती. या दुकानांत आलेल्या ग्राहकांच्या मोटरसायकली रस्त्यावर लावण्यात आल्याने पादचारी आणि वाहनचालकांना मोठा त्रास करावा लागत होता. मात्र, अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आल्याने रस्त्यांनी माेकळा श्वास घेतला आहे. परिणामी, नगरपालिकेच्या भूमिकेचे सामान्य नागरिकांतून काैतुक हाेत आहे.
अवैध बांधकाम जमीनदाेस्त...
निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बँक कॉलनी रोडवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाचा सर्वसामान्यांसह वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत हाेता. दुकानदारांनी आपली दुकाने रस्त्यावरच आणल्याने ग्राहक आणि त्यांच्या वाहनांमुळे या मार्गावर वाहतूक काेंडी हाेत हाेती. सदरील चाैक आणि मार्गावर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून स्थानिक त्रस्त नागरिकांनी केली हाेती. या मागणीचा विचार करत नगरपालिका प्रशासनाने सदरच्या अतिक्रमणांवर हाताेडा मारला आहे. अवैध बांधकामे जमीनदाेस्त केली आहेत. यातून चाैकासह रस्त्याने माेकळा श्वास घेतला आहे.
पाेलीस बंदाेबस्तात राबविली माेहीम...
निलंगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील यांनी पुढाकार घेत सदरची अतिक्रमण माेहीम फत्ते केली आहे. यासाठी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक रमेश सोनकांबळे यांच्यासह ४० महिला आणि ६० पुरुष कामगारांचे पथक नियुक्त करण्यात आले हाेते. जेसीपी, ट्रॅक्टरच्या मदतीने सदरची माेहीम यशस्वी करण्यात आली आहे. यासाठी पाेलीस प्रशासनाकडून तगडा बंदाेबस्तही तैनात करण्यात आला. बुधवारी सकाळीच अचानक अतिक्रमणावर हाताेडा मारण्यात आल्याने अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले.