हाळी हंडरगुळी : हाळी हंडरगुळीतील प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानक असले तरी निर्मितीपासून अद्यापपर्यंत डांबरीकरण करण्यात आले नाही. तसेच आवश्यक सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. परिणामी, हे स्थानक नावालाच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ध्येय उराशी बाळगून असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे २८ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बसस्थानकाची उभारणी केली. हे गाव बाजारपेठेचे असल्यामुळे परिसरातील २० ते २५ गावांतील सतत नागरिकांची रेलचेल असते. त्यामुळे येथे प्रवासी संख्या अधिक आहे. परंतु, येथील स्थानकात प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत. स्थानकाच्या निर्मितीपासून अद्यापपर्यंत बसस्थानक परिसरात डांबरीकरण करण्यात आले नाही. उन्हाळ्यात स्थानकात धुळीचे साम्राज्य निर्माण होते तर पावसाळ्यात चिखलाचे डेरे निर्माण होतात. परिणामी, चालणेही कठीण असते. त्यामुळे प्रवासी बसस्थानकात जाण्यास टाळतात. रस्त्यावरच थांबून बसची प्रतीक्षा करीत असतात.
नवीन प्रवासी स्थानकात गेले असल्यास बस आली की अंगावर चिखल उडतो. चिखलामुळे प्रवाशांना ये-जा करणे कठीण होत आहे तर चालकांनाही कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, स्थानकातील गिट्टी उघडी पडली आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे ही नुकसान होत आहे.
दुर्गंधीने होते प्रवाशांचे स्वागत...
बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात कचरा, घाण पडलेली आहे. पावसाळ्यात दुर्गंधी पसरत असते. प्रवाशांचे स्वागत दुर्गंधीने होते. हाळी हंडरगुळी हे बाजाराचे गाव असल्याने परिसरातील नागरिकांचा येथे दैनंदिन संपर्क असतो. तसेच जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी राज्यासह परराज्यातील येथे व्यापारी येतात. मात्र सुविधा उपलब्ध नाहीत.
पिण्याच्या पाण्याची साेय नाही...
बसस्थानकात किमान पिण्याच्या पाण्याची सोय असणे आवश्यक आहे. परंतु, येथे तिही सुविधा उपलब्ध नाही. उपाहारगृह काही दिवसांपासून कुलूपबंद आहे. त्यामुळे तहान लागल्यास प्रवाशांना बाहेरील हॉटेलमध्ये जावे लागत आहे. याशिवाय, स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तिथे जाण्यासही प्रवासी धजावत नाहीत. या परिसरात झाडे-झुडपे वाढली आहेत.
लोकप्रतिनिधींकडून आश्वासनेच...
२०१३ साली तत्कालीन पालकमंत्री व राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षांना हाळी हंडरगुळी येथील ग्रामस्थांनी बसस्थानकाच्या विकासासाठी साकडे घातले होते. तेव्हा स्थानकातील सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासनमंत्र्यांनी दिले होते. मात्र, अद्यापही सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.