लातूर : ‘मॉर्निंग वॉक’ला बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या हातातील महागडे मोबाईल हिसकावत पळ काढणाऱ्या आंतरराज्य टोळीचा लातूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासात छडा लावला. दोघा सराईत आरोपींसह एका बालकाला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १७ महागडे मोबाईल, दुचाकी व कॉम्प्यूटर संच असा ४ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धक्कादायक म्हणजे, माेबाइल शाॅपीचा मालकच सूत्रधार निघाल्याचे समाेर आले आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, शासकीय पोलिस वसाहतीत राहणारे सहायक पाेलिस निरीक्षक बाळासाहेब विष्णू डोंगरे हे रविवार, १८ जानेवारी रोजी सकाळी एमआयडीसी परिसरात मॉर्निंग वॉक करत हाेते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या हातातील १ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचा ‘सॅमसंग एस-२५ अल्ट्रा’ मोबाईल हिसकावत पळ काढला. याबाबात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक समाधान चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तातडीने तपासची चक्रे फिरवली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याच्या माहितीनुसार पोलिसांनी विकास बाळू राठोड (वय २२, रा. विकास नगर, लातूर) आणि प्रजापती मुरलीधर सोनवणे (वय ४५, रा. वाल्मिकी नगर, लातूर) यांना ताब्यात घेतले आहे. जप्त मोबाईलवरून मूळ मालकांचा शोध घेतला जात आहे. आरोपींनी इतर अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, लातूर शहर डीवायएसपी समिरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पाे.नि. समाधान चवरे, सपाेनि. भाऊसाहेब खंदारे, पाेउपनि. सुरेश पाेगुलवार, भीमराव बेल्लाळे, बळवंत भाेसले, राजाभाऊ मस्के, रामभाऊ जाधव, अक्षय डिगाेळे, विश्वनाथ डाेंगरे यांच्या पथकाने केली.
तर मोबाईल शॉपीचा मालकच निघाला सूत्रधारधक्कादायक बाब म्हणजे, अटकेत असलेला आरोपी प्रजापती सोनवणे हा संविधान चौकातील ‘सत्यम मोबाईल शॉपी’चा मालक आहे. तो चोरीच्या मोबाईलचे लॉक तोडून आरोपींना तांत्रिक मदत करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्यातील सॅमसंग मोबाईलसह इतर २ लाख ५० हजार रुपये किमतीचे १६ मोबाईल आणि लॉक तोडण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे.
Web Summary : Latur police busted an interstate gang looting morning walkers, recovering stolen mobiles worth ₹4.57 lakhs. Shockingly, the gang leader is a mobile shop owner who unlocked stolen devices.
Web Summary : लातूर पुलिस ने सुबह की सैर करने वालों को लूटने वाले एक अंतरराज्यीय गिरोह का भंडाफोड़ किया, ₹4.57 लाख के चोरी के मोबाइल बरामद किए। चौंकाने वाली बात है, गिरोह का नेता एक मोबाइल दुकान का मालिक है जो चोरी के उपकरणों को अनलॉक करता था।