लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : विद्यार्थी चार भिंतीबाहेर जास्त वेळ फक्त शाळेतच राहात असतो. त्यामुळे केवळ शालेय परिसरच स्वच्छ असून चालत नाही, तर शाळेचे बाह्यांग - अंतरंगही सुंदर आणि शैक्षणिक प्रेरणा देणारे आवश्यक आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील पाचशे जिल्हा परिषद शाळांमध्ये सीईओ अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून सुंदर, स्वच्छ आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी आनंददायी शिक्षणाअंतर्गत ‘बाला’ (बिल्डिंग ॲज लर्निंग एड) हा उपक्रम राबविला जात आहे.
प्रारंभी २०२० - २१ मध्ये बाला उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या ५०० शाळांची निवड करण्यात आली. यापैकी काही शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून, २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षात उर्वरित शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. तसेच शाळांचे मूल्यांकनही केले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य स्रोत शाळेची इमारत आणि शालेय परिसर आहे. पाठ्यपुस्तकांच्या जगात वावरत असताना मुलांना हसत - खेळत व कृतियुक्त शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून शाळेच्या चौकोनी, आयताकृती भिंती, गोल गट्टे, वर्गातील कोपरे, वर्गाच्या चौकटी, दरवाजे, पायऱ्या, झाडांचे बूड, वर्गाचा छत, पिलर्स, संरक्षक भिंती आदी भौतिक साधनांचा उपयोग रंगरंगोटीच्या माध्यमातून वेगवेगळे भौमितिक आकार, कोनमापक, मोजपट्टी, वर्तुळ, विविध प्रकारच्या कोनांच्या आकृत्या याशिवाय, भाषा, भूगोल आदी विषयांचे मूळ ज्ञान विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने देता यावे, यासाठी साकारले जाणार आहे.
लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असताना उपक्रमाच्या तयारीसाठी हा काळ उपयोगात आणला गेला. दरम्यान, जिल्ह्यातील पाचशे शाळांची निवड यासाठी झाली असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर राहणार आहे.
तालुका निवड झालेल्या शाळा
लातूर ७०
रेणापूर ३५
औसा ६०
निलंगा ६०
शिरूर अ. ३५
देवणी ३५
उदगीर ६०
जळकोट ३५
अहमदपूर ६०
चाकूर ५०
१ जुलैपासून होणार मूल्यांकन...
बाला अर्थात इमारत एक शैक्षणिक साधन या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी शाळांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शंभर गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार असून, बांधकाम ३० गुण, रंगरंगोटी १०, शालेय परिसर १०, तर समाज सहभाग ३० गुण, नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी २० असे १०० गुणांचे मूल्यांकन होणार आहे. १ जुलैपासून तालुकास्तरीय समितीमार्फत शाळांना भेटी देण्यात येणार आहेत.
शालेय मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला मिळणार आकार
या उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसराचा कायापालट केला जाणार आहे. पाठ्यपुस्तकांसोबतच कृतियुक्त शिक्षण देण्याचा मानस या उपक्रमात आहे. वर्ग खोलीमध्ये अभ्यासपूर्ण रंगरंगोटीसोबतच शाळेच्या परिसरातही अभ्यासात्मक संकल्पना साकारल्या जाणार आहेत. ज्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होईलच. सोबतच शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळेल.