अहमदपूर : पूर्वी तोंडाला मास्क लावला की सर्व जण संशयाने तर कधी कुतूहलाने पहायचे; पण आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने प्रत्येकास मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे बाजारपेठेत विविध प्रकारचे मास्क उपलब्ध झाले आहेत. काही व्यावसायिकांचे मास्क हे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.
कोरोनापूर्वी मास्कचा वापर अत्यंत क्वचित केला जात असे. बहुतांशवेळा दवाखान्यातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी ऑपरेशन थिएटरमध्ये वापरत असत. एखाद्याने मास्क लावल्याचे दिसून आल्यास त्याच्याकडे मोठ्या कुतूहलाने पाहून अपमान केला जात असे. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे सर्व जण घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच आता मॅचिंगचे मास्क खरेदीचा कल निर्माण होत आहे.
दरम्यान, बऱ्याचदा काही जणांकडून मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहून प्रशासनाने दंडात्मक कार्यवाही सुरू केली आहे. दंड भरण्यातून मुक्ती मिळविण्यासाठी प्रत्येक जण मास्क वापरत आहे. त्यामुळे मास्क खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. सध्या लग्नसराई आहे. विवाह समारंभास उपस्थितीची मर्यादा लागू करण्यात आली आहे. समारंभात नववधू- वर पेहरावानुसार मॅचिंग आणि डिझाइनचे मास्क खरेदी करीत आहेत.
कार्टूनचे मास्कही उपलब्ध...
सध्या बाजारात विविध डिझाइन्सचे, एन ९५ अशा विविध प्रकारचे मास्क उपलब्ध झाले आहेत. पाच रुपयांपासून ते १२० रुपयांपर्यंत मास्क उपलब्ध आहेत. मुलांसाठी कार्टूनचे मास्कही बाजारात आले आहेत. तरुण तसेच मुलींना आवडतील अशा वेगवेगळ्या वयोगटानुसार वेगवेगळे मास्क उपलब्ध आहेत.