लातूर : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणाची शहरात गैरसोय होऊ नये म्हणून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शहरात वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाने नुकताच हा निर्णय घेतला असून येत्या शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
लातूर शहरात दरवर्षी महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. परंतु शहरांमध्ये माफक दरात निवासाची सोय नाही. एका विद्यार्थ्याला महिन्याला दीड ते दोन हजार रुपये खासगी वसतिगृहात भाडे आकारले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या मुला-मुलींच्या निवासाचा प्रश्न निर्माण होतो. ही गरज ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीने लातूर शहरामध्ये मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरजू शेतकऱ्यांच्या मुलींना अगदी माफक दरामध्ये निवासाची सोय होणार आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी यापूर्वीपासूनच वसतिगृह चालविले जाते. या वसतिगृहामध्ये मुलांना अकराशे रुपये भाडे वार्षिक घेतले जाते. आता याच धर्तीवर मुलींसाठी वसतिगृह सुरू केले जाणार आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाने तसा निर्णय घेतला असून ते लवकरच सुरू होणार असल्याचे सभापती ललित भाई शहा यांनी सांगितले. बाजार समितीमुळे शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षण खर्चात थोडी बचत होणार आहे.
महाराष्ट्रातली पहिली बाजार समिती....
खास शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृहाची सोय करणारी महाराष्ट्रातील लातूर बाजार समिती ही पहिली असून यामुळे ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या निवासाचा प्रश्न सुटला आहे. खासगी वसतिगृहातील भाडे, रूम परवडणाऱ्या नाहीत. त्याचा विचार करून लातूर बाजार समितीने मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने बाजार समितीचे कौतुक होत आहे.
शेतकरी संघटनेच्यावतीने सत्कार
शेतकऱ्यांच्या मुलींसाठी वसतिगृह निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी संघटनेच्यावतीने सभापती दलित भाई शहा यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी संघटनेचे राजकुमार सस्तापुरे यांनी बाजार समितीच्या निर्णयाचे कौतुक करून सभापतींचा सत्कार केला.