पोलिसांनी सांगितले, सुल्लाळी (ता. जळकोट) येथील अंकिता या बावीस वर्षीय महिलेचा विवाह मे २०१९ मध्ये लातूर येथील योगीराज इगडे यांच्याशी झाला होता.
दरम्यान, अंकिताचे वडील शेतकरी असताना देखील आपल्या ऎपतीप्रमाणे दहा तोळे सोने, संसारोपयोगी साहित्य देऊन लातूरला लग्न लावून दिले होते. अंकित यांचा पती मुंबई येथील एका कंपनीत नोकरी करत होता. लग्नानंतर सहा महिने संसाराचा गाडा नीट चालत असताना पती योगीराज इगडे, सासरा भालचंद्र इगडे, सासू शिवकांता इगडे, दीर परमेश्वर इडगे यांनी मोटारसायकल घेऊन ये म्हणून तिला त्रास दिला. त्यामुळे अंकिताच्या वडिलांनी ५० हजार आणून दिले. कोरोना काळात अंकिताच्या पतीची नोकरी गेली. त्यामुळे वडिलांकडून धंदा करण्यासाठी पाच लाख रुपये आण म्हणून सासरच्या लोकांनी तगादा लावला. अंकिताने एवढी रक्कम मला माझे वडील देऊ शकत नाहीत म्हटल्यामुळे अंकिताला उपाशीपोटी ठेवून मारहाण व जाच करू लागले. या संदर्भात महिला निवारण केंद्रात तक्रार दिली असता पसंत नाही म्हणून घराबाहेर काढले. याच त्रासाला कंटाळून पीडितेने जळकोट पोलिसात फिर्याद दिली. या तक्रारीवरून सासरच्या चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक गणेश तोंडारे यांच्या मार्गदर्शनात जमादार गोविंद पवार करीत आहेत.