नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. सभेस मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, उपनगराध्यक्ष अलिशेर कुरेशी, पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, नगरसेवक भरत सूर्यवंशी, गटनेते सुनील उटगे, जावेद शेख, अंगद कांबळे, मुजाहिद शेख, गोपाळ धानुरे, उन्मेष वाघदारे, मंजुषा हजारे, कीर्ती कांबळे, परवीन शेख, मेहराज शेख, लक्ष्मीबाई माळी, शिल्पा कुलकर्णी, रुपेश दुधनकर यांची उपस्थिती होती.
या सभेत छत्रपती शिवाजी महाराज प्रदर्शन हॉल उभारणीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. शेख यांनी दिली. या सर्वसाधारण बैठकीत शहरातील मालमत्ता सर्वेक्षण, ओपन स्पेस ताब्यात घेऊन विकसित करणे, नवीन हद्दवाढीचा विकास, वारकरी भवन, गाळे फेरलिलाव, मागासवर्गीय स्मशानभूमीचा विकास करणे यासंबंधीच्या ठरावासही मान्यता देण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्याचे रुंदीकरणाचे काम बऱ्याच वर्षापासून रखडले आहे. हे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी नागरिक व व्यापारी वर्गातून सतत केली जात आहे. मात्र, भूसंपादन विभागाकडून या रस्त्याच्या कार्यवाहीत विलंब होत असल्याचे कारण पालिका प्रशासनाकडून सांगितले जात होते. यावर या रस्त्याचे तात्पुरते डांबरीकरण करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला आहे.
तात्पुरत्या डांबरीकरणास विरोध...
दरम्यान, गुरुवारी माजी नगराध्यक्ष किरण उटगे यांनी पत्रपरिषदेत पालिकेने घेतलेल्या मराठा भवन व वारकरी भवन तसेच इतर विकास कामांच्या ठरावांचे स्वागत केले. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील रस्त्याच्या तात्पुरत्या डांबरीकरणास विरोध दर्शविला. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करूनच रस्त्याचे रुंदीकरण करावे असे सांगून तात्पुरते डांबरीकरण केल्यास पुढे दहा वर्ष या रस्त्यावर कोणतीही विकास काम करता येत नसल्याचे सांगितले. तसेच कायदेशीर अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आणून दिले. पालिकेने रुंदीकरण करूनच रस्त्याचे काम करण्यात यावे अशी केली.