लातूर : मांजरा प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ३२२ मि.मी. पाऊस झाला असून, यंदाच्या पावसाळ्यात १० दलघमीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. आता प्रकल्पात ३९.३५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, मृतसाठा ४७.१३ दलघमी आहे. तर एकूण पाणीसाठा ८६.४८ दलघमी आहे.
गतवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा जुलै महिन्यात दहा दलघमी नवीन पाणी आले आहे. धरण क्षेत्रात आणखी मोठा पाऊस झाला नसल्यामुळे फक्त १.७६ दलघमीचा येवा आहे. प्रकल्पाची क्षमता २२४.०९३ दलघमीची आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने धरण भरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. लातूर शहरासह केज, कळंब, धारूर, अंबाजोगाई, मुरुड, लातूर एमआयडीसी आदी शहराचा पाणीपुरवठा या प्रकल्पावर आहे. २०१६ च्या अभूतपूर्व पाणी टंचाईनंतर तीनवेळा धरण भरले आहे. या पावसाळ्यातही धरण भरेल, अशी अपेक्षा आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस होत असल्याने थोडा येवा प्रकल्पात येत असल्याचे लातूर महानगरपालिकेचे अभियंता कलवले यांनी सांगितले.
४० ते ५० एमएलडी पाण्याची उचल
लातूर शहरासाठी दररोज ४० ते ५० एमएलडी दररोज मांजरा प्रकल्पातून पाणी घेतले जाते. त्यातून लातूर शहराला दर आठवड्याला पाणीपुरवठा केला जात आहे. २०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर प्रकल्पामध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा होत गेल्याने पाणीटंचाई जाणवली नाही. गतवर्षी पूर्ण क्षमतेने धरण भरल्यामुळे शेतीलाही पाणी सोडण्यात आले होते.