शासकीय निवासस्थानातून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:20 AM2021-05-11T04:20:07+5:302021-05-11T04:20:07+5:30

जळकोट : जळकोट हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. परंतु, त्यांच्यासाठी कार्यालयाची इमारत उपलब्ध ...

Management of Taluka Medical Officers from Government Residence | शासकीय निवासस्थानातून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कारभार

शासकीय निवासस्थानातून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कारभार

Next

जळकोट : जळकोट हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. परंतु, त्यांच्यासाठी कार्यालयाची इमारत उपलब्ध नसल्याने शासकीय निवासस्थानातून कारभार पाहावा लागत आहे. विशेष म्हणजे, शासकीय निवासस्थानाला ही उंदीर, घुशींनी पोखरले आहे.

तालुक्यातील रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी. शासनाच्या आरोग्य योजनांचा प्रभावीपणे प्रचार व्हावा आणि त्याचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना व्हावा. तसेच तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवर नियंत्रण रहावे म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी हे पद आहे. जळकोट येथे ही या पदावर डॉक्टरांची नियुक्ती आहे. परंतु, त्यांच्यासाठी आवश्यक असलेले कार्यालय अद्यापही उपलब्ध नाही. परिणामी, त्यांना ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय निवासस्थानातून काम पाहावे लागत आहे. तालुक्यातील एखादा व्यक्ती तक्रार घेऊन आल्यास त्याला बसण्यासाठी ही निवासस्थानात पुरेशी जागा नाही. विशेष म्हणजे, या निवासस्थानाला उंदीर, घुशींनी पोखरले आहे.

जळकोटात २५ वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले होते. तेथील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थाने बांधण्यात आली. मात्र, कालांतराने या निवासस्थानात ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले. त्यामुळे ती हस्तांतरित करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थाने असली तरी ती जीर्ण झाली आहेत. दरवाजे, खिडक्यांची मोडतोड झाली आहे.

विशेष म्हणजे, ही निवासस्थाने शहरापासून ३ किमी अंतरावर आहेत. सध्या या निवासस्थान सभोवताली घुशी, उंदरांचा वावर वाढला आहे. निवासस्थानातील वीजपुरवठा रात्री खंडित झाल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. अशीच स्थिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची आहे.

ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना रात्रपाळी वेळी आपला मुक्काम ओपीडीमध्ये ठेवावा लागत आहे. कारण शासकीय निवासस्थान रुग्णालयापासून दूर आहे. त्यामुळे या निवासस्थानांची दुरुस्ती करण्यात यावी अथवा नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी...

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक शिवानंद देशमुख, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेटे, संग्राम नामवाड, खादरभाई लाटवाले, आयुब शेख यांनी केली आहे. स्वतंत्र इमारतीमुळे आरोग्य सेवा मिळण्यास तसेच रुग्णांच्या अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे.

Web Title: Management of Taluka Medical Officers from Government Residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.