२०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर लातूर शहरात पाणीटंचाई जाणवली नाही. कारण, २०१६ च्या पावसाळ्यापासून मांजरा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. गतवर्षीही धरण ८० टक्क्यांच्या पुढे भरले होते. त्यामुळे धरणात मुबलक पाणी आहे आणि होते. सध्याही धरण ८८ टक्क्यांच्या पुढे भरले आहे. त्यामुळे शहराला पाण्याची टंचाई नाही. परंतु, मनपाच्या तांत्रिक अडचणीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मांजरा धरणावरील पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्ती करत असतानाच फायबर सिटी आणि सिटी फायबर बस्ट झाले आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुरुस्ती झालेली नव्हती. परिणामी, सोमवारी शहरात पाणीपुरवठा होईल की नाही याची खात्री नाही. पुढील दोन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लागणार आहेत. एकदा महापालिकेकडे महावितरणचे वीज बिल थकल्यामुळे मागे एकदा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद होता. शिवाय, गेल्या दोन महिन्यांपूर्वी असाच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा पाच-सहा दिवस बंद होता. या ना त्या कारणाने लातूर शहरवासीयांना गेल्या वर्षभरात तीन वेळा पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले आहे.
मांजरा धरणावर कधी पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, तर कधी इलेक्ट्रिकल बिघाड होतोय. गेल्या वर्षभरात दोन वेळा असे बिघाड झाले आहेत. कायमस्वरूपी दुरुस्ती का केली जात नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मांजरा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असताना केवळ तांत्रिक अडचणीमुळे लातूरकरांची गैरसोय होत आहे. शनिवारी फायबर सीटची दुरुस्ती केल्यानंतर सिटी फायबर जळाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या दोन दिवसांपासून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. फायबर सीट आणि सिटी फायबर वारंवार जळत असल्यामुळे दुरुस्तीला वेळ लागत आहे, असे महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नागनाथ कलवले यांनी सांगितले.
आजपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल...
रविवारी दुरुस्ती झाली तर पंपिंग करून पाण्याची उचल केली जाणार आहे. आर्वी तसेच हरंगुळ येथील जलशुद्धिकरण केंद्रात पाण्याचे शुद्धिकरण करून शहरातल्या जलकुंभामध्ये पाणी घेऊन आज, सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेचा असल्याचे पाणीपुरवठा अभियंता कलवले यांनी सांगितले.