अध्यक्षस्थानी भाजपाचे अरविंद पाटील निलंगेकर होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, पी. आय. अनिल चोरमले, बीडीओ अमोल ताकभाते, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, धनंजय गायकवाड, गुलाबराव मुळे, शिवप्रसाद मुळे, विजयकुमार सगरे, संजय कदम, प्रमोद कुदळे यांची उपस्थिती होती.
यावेळी विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित, संघटनांनी मेजर अतुल पाटील यांचा सत्कार केला. यावेळी प्रल्हाद बाहेती, धनंजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी मनोगत व्यक्त केले. सतीश हानेगाव यांनी मुलाखत घेतली. प्रास्ताविक श्रीशैल्य बिराजदार, सूत्रसंचालन प्रा. सतीश हाणेगाव यांनी केले.
स्वकर्तृत्वावर भरारी...
अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले, आयुष्यात सतत नवीन काहीतरी शिकत राहिले पाहिजे. मेजर अतुल पाटील यांनी लहान वयात स्वकर्तृत्वाच्या बळावर यश संपादन केले आहे. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक. शहरात निर्माण झालेले विविध प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येतील.
यावेळी मेजर अतुल पाटील यांनी आपला जीवनपट उलगडून सांगितला. मी प्रथमतः मातृभूमीवर प्रेम करणारा एक निष्ठावान सैनिक आहे. स्वतः, कुटुंबापेक्षा आम्हा सैनिकांना नाम, नमक, निशाण हे प्राणाहून प्रिय असते. त्यामुळे आम्हाला युद्धात मृत्यूची भीती वाटत नाही. भारतीय सैन्य दलातील प्रत्येक सैनिक कसल्याही प्रतिकूल परिस्थितीत तग धरून विजय प्राप्त करू शकतो, अशी अचाट क्षमता प्रत्येक सैनिकात असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
आपण व्यापार, उद्योग, शेतीत खूप गूंतवणूक करतो, पण आपल्या मुलांमध्ये व शिक्षणामध्ये आपणही आर्थिक गुंतवणूक केली पाहिजे. समृद्ध विचारातूनच नवीन समृद्ध विचारांची सशक्त पिढी जन्माला येऊ शकते. अशा सशक्त विचारांच्या नवीन पिढीवर खऱ्या अर्थाने व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्राचे भवितव्य अवलंबून असते. त्यासाठी सतत नागरिकांनी जागृत राहून आपले जीवनकार्य करीत राहिले पाहिजे.