नागरसोगा : शेती बागायत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पीव्हीसी पाईपच्या दरात चार महिन्यांत जवळजवळ ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे या दरवाढीवर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न बळीराजास पडला आहे.
रब्बी हंगाम संपल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगमाची तयारी केली आहे. सध्या शेत-शिवारात कोणतेही पीक नसल्याने शिवार मोकळा आहे. त्यामुळे शेतकरी शेती बागायत करण्यासाठी आता खुल्या शेतात पीव्हीसी पाईप टाकणे, त्याची दुरुस्ती करण्याची कामे करीत आहेत. दरम्यान, शेतीशी निगडित सर्व साहित्यांचे भाव वाढले आहेत. पीव्हीसी पाईप, रासायनिक खत, फवारणीच्या औषधांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. परिणामी, शेतीतील कामे थांबली आहेत.
पाईप, वॉल, कपलिंग, पॅच, एलबो, टी, फुटबाॅल असे पीव्हीसी पाईपशी निगडित वस्तूंच्या दरामध्ये ४० टक्के वाढ झाली आहे.
तसेच डिझेलचे दरही वाढले आहेत. त्यामुळे जेसीबीच्या ताशी कामाचे दरही वाढले आहेत. त्यामुळे बागायती शेती करणाऱ्या शेतक-यांनी पाईप खरेदीला ब्रेक लावला.
गेल्यावर्षी दोन इंची पाईप ३३०, अडीच इंची पाईप ४३०, साडेतीन इंची पाईप ६३०, साडेचार इंची पाईप १०९०, आरआरजी अडीच इंची १००, साडेतीन इंची आरआरजी १३० रुपये, असे भाव होते. सध्या अडीच इंची पाईप ७१०, साडेतीन इंची पाईप ९९०, साडेचार इंची पाईप १४४०, आरआरजी १३० रुपये, तर साडेतीन इंच आरआरजी १५० रुपये असा दर झाला आहे.
गेल्यावर्षी तुलनेत यंदा पीव्हीसी पाईपच्या दरात वाढ झाली आहे. कोरोनामुळे शेतकरी अडचणीत असताना दरवाढीने पुन्हा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शासनाने शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
कच्च्या साहित्याचे दर वाढले...
कोरोनामुळे कच्च्या मालाची कमतरता असून, किमतीत वाढ झाली आहे. तसेच कामगार कमी झाले आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊन कंपन्या या साहित्यांची वाढ करीत आहेत. त्याचा फटका व्यवसायालाही बसला आहे. दरवर्षीपेक्षा ४५ ते ५० टक्के पाईप यंदा कमी विक्री झाली आहे. छोट्या शेतक-यांनी तर पाईपलाईन कामे थांबविली आहेत, असे व्यावसायिकांनी सांगितले.
आर्थिक अडचण वाढली...
कोरोनामुळे आर्थिक अडचण वाढली आहे. गेल्यावर्षी पाईपलाईन काम करावयाचे होते; मात्र काही आर्थिक अडचणींमुळे राहिले. यंदा पीव्हीसी पाईप खरेदीसाठी गेलो असता दरात ४० टक्के वाढ झाल्याचे समजले. त्यामुळे मोठी अडचण झाली असल्याचे येथील शेतकरी भास्कर सूर्यवंशी यांनी सांगितले.