लातूर : उदगीर तालुक्यातील ताेंडार शिवारातील दाेघा शेतकऱ्यांच्या शेतातील चार म्हशी आणि एक वासरु अज्ञातांनी पळविल्याची घटना बुधवार, २७ जानेवारी राेजी घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञातांविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले की, फिर्यादी नीळकंठ प्रभूराव बिरादार (वय ३३, रा. ताेंडार, ता. उदगीर) यांच्यासह विठ्ठल हाेणराव पाटील यांच्या शेतातील दावणीला बांधलेल्या चार म्हशी आणि एक वासरु असे एकूण १ लाख ८५ हजारांचे पशुधन चोरट्यांनी चोरुन नेले आहे. ही घटना बुधवार, २७ जानेवारी राेजी ताेंडार येथील शिवारात घडली. पशुधनमालकांनी आपल्या पशुधनाची सर्वत्र शाेधाशाेध केली. मात्र, त्यांची जनावरे कोठेही सापडली नाहीत. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस नाईक घाेडके करत आहेत.
पशुधन पळवणारी टाेळी सक्रिय...
लातूर जिल्ह्यात दुचाकीसह इतर वाहने पळवणारी टाेळी सक्रिय आहे. आता पशुधन पळवणारी टाेळीही सक्रिय झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून निलंगा, औसा, उदगीर, अहमदपूर, रेणापूर आणि देवणी तालुक्यातील गाव शिवारातून पशुधनाची चाेरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत त्या-त्या पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, चाेरट्यांचा सुगावा अद्यापही लागलेला नाही. सीमाभागात या चाेरीचे प्रमाण अधिक आहे. शेतातील गाेठ्यात दावणीला बांधलेले पशुधन वाहनातून चाेरुन नेले जात असल्याचे समाेर आले आहे.