लिंबोटीचे पाणी अहमदपुरात पोहोचले, वितरण व्यवस्थेतील त्रुटी सुटेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:20 AM2021-01-25T04:20:05+5:302021-01-25T04:20:05+5:30

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पावरूनच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, शहरातील जुन्या फिल्टर येथे पाणी पोहोचले आहे. ...

Limboti's water reaches Ahmedpur, distribution system failure | लिंबोटीचे पाणी अहमदपुरात पोहोचले, वितरण व्यवस्थेतील त्रुटी सुटेनात

लिंबोटीचे पाणी अहमदपुरात पोहोचले, वितरण व्यवस्थेतील त्रुटी सुटेनात

Next

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पावरूनच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, शहरातील जुन्या फिल्टर येथे पाणी पोहोचले आहे. मात्र, वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे शहरवासीयांना अद्याप सुरळीत पाणीपुरवठा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा अजूनही शहरवासियांना मृगजळच ठरत आहे.

तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे केवळ जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून, शनिवारी पाणी शहरातील जुन्या फिल्टरमध्ये दाखल झाले. विद्युत पंप कार्यान्वित होऊन १९ दिवस झाले. १९ किमीच्या जलवाहिनीतून पाणी प्रवासासाठी पालिकेला १९ दिवस परिश्रम घ्यावे लागले. अनेक ठिकाणी गळती होणे, मोठे व्हॉल्व फुटणे, एअर वॉल बंदमुळे जलवाहिनी फुटणे असे प्रकार झाले. त्यामुळे जलवाहिनीच्या तांत्रिक दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पालिका प्रशासनाच्या प्रयत्नाने हे पाणी शहरातील जुन्या फिल्टरमध्ये आले असून आता यापुढे नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी मोठ्या फिल्टरचे काम होणे गरजेचे आहे. लिंबोटीवरील पंप पूर्णक्षमतेने अजून सुरू केले नसून, त्यांची क्षमता ६५ लाख लीटर आहे. मात्र, शहरातील फिल्टरची क्षमता केवळ ४० लक्ष लीटर प्रति दिन असल्यामुळे पाणी जास्त येऊनही फिल्टर होणार नसल्यामुळे पाणीपुरवठा नियमित व सुरळीत होणार नाही.

नवीन फिल्टरचे काम अजून सहा महिने होणार नसल्याचे कामाच्या प्रगतीवरून दिसत आहे, तसेच शहरातील वितरण प्रणालीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, २० टक्के कामामुळे वितरण प्रणालीही कार्यान्वित होणार नसल्याचे समजते. त्यामुळे अहमदपूरकरांना नियमित पाणीपुरवठ्यासाठी आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

सुरळीत पाणीपुरवठा करावा...

गुत्तेदाराने दर्जाहिन काम केल्यामुळे १९ किमीसाठी १९ दिवस लागले. शहरातील फिल्टरचे काम आणखीन सहा महिने होणार नाही. वितरण व्यवस्थेचे कामही प्रलंबित आहे. गुत्तेदाराच्या चुकीमुळे अहमदपूरकरांना सुरळीत पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नगरसेवक रवि महाजन व संदीप चौधरी यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन पालिका व गुत्तेदाराच्या निषेधार्थ २६ जानेवारी आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

नियमित पुरवठ्यासाठी वेळ लागणार...

नियमित पाणीपुरवठ्यासाठी नवीन फिल्टर व्यवस्था सुरू होणे गरजेचे आहे. सध्या जलवाहिनीची ६५ लक्ष लीटर दररोज क्षमता असताना, फिल्टर मात्र ४० लाख लीटरने काम करीत आहे. त्यामुळे शहरवासीयांना आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.

Web Title: Limboti's water reaches Ahmedpur, distribution system failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.