अहमदपूर : येथील मध्यवर्ती बसस्थानक हे विविध समस्यांनी ग्रासले आहे. स्थानकातील पत्रे फुटल्याने पावसाळ्यात गळती लागत आहे. परिणामी, प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे. याशिवाय, पिण्यासाठी पाण्याची सुविधा नाही. ठिकठिकाणी कचरा पडल्याने दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव गुदमरत आहे.
अहमदपूर तालुक्यातील वाडी- तांड्यासह जवळपास १२४ गावांतील नागरिकांची येथे दररोज रेलचेल असते. तसेच रत्नागिरी- नागपूर महामार्ग हा शहरातून असल्याने सतत वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. विविध कामानिमित्त नागरिक स्थानकात येत असतात. मात्र, येथील स्थानकात सुविधांचा बोजवारा उडला आहे. स्थानकावर सिमेंटचे पत्रे आहेत; परंतु ते काही दिवसांपूर्वी फुटले आहे. पावसाळ्यामुळे गळती लागत आहे. परिणामी, प्रवाशांना तिथेच थांबून एसटी प्रतीक्षा करावी लागत आहे. याशिवाय, प्रवाशांना पिण्यासाठी पाण्याचीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे हॉटेलचा आधार घ्यावा लागत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांना उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून पंखे बसविण्यात आले आहेत; परंतु ते सध्या बंद आहेत. त्यामुळे वाऱ्याची झुळूक आली की पंखा फिरतो. ठिकठिकाणी कचरा पडला. परिणामी, मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे. अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरत आहे. स्थानकातील उपहारगृहाच्या बाजूलाच घाणीची दलदल निर्माण झाली आहे. ये-जा करणाऱ्यांना घाणीचा त्रास होत आहे. काही जण उघड्यावर लघुशंका करीत असल्याने ये- जा करणाऱ्या प्रवाशांना नाका- तोंडाला रुमाल लाऊन यावे लागते. स्वच्छतागृहाची स्वच्छता नसल्याने मोठी समस्या आहे. बसस्थानक परिसराच्या स्वच्छतेसाठी दोन सफाई कामगार असले तरी वेळेवर सफाई होत नाही. याशिवाय, स्थानकात वाहन तळासाठी जागा निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे कुठेही दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करण्यात येत आहेत.
भुरट्या चोऱ्या वाढल्या...
बसस्थानकात भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. स्थाकात पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती असली तरी ते तिथे थांबत नाहीत. याकडे पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
लघुशंकेसाठी स्थानक परिसराचा आधार...
पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छतागृह नाहीत. परिणामी, बाहेरून आलेले लघुशंकेसाठी स्थानक परिसराचा वापर करतात. तसेच स्थानकानजीकच्या छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांकडून दुकानातील कचरा या परिसरात टाकला जातो. संबंधितांनी लक्ष देऊन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
दोन सफाई कर्मचारी नियुक्त...
स्थानकाच्या स्वच्छतेसाठी दोन सफाई कर्मचारी आहेत; परंतु हातगाड्यावरील व्यावसायिक स्थानक परिसरात सतत कचरा टाकत असतात. लघुशंकेसाठी शहरात व्यवस्था नसल्याने व्यवसायिक, प्रवासी, नागरिक बसस्थानकाच्या खुल्या जागेचा वापर करीत आहेत. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. पालिकेने बाजारपेठेतील व्यावसायिकांसाठी स्वच्छतागृह बांधणे आवश्यक आहे.
- एस. जी. सोनवणे, आगारप्रमुख.