राजकुमार जाेंधळे
औसा (जि.लातूर) : शेतातील शेडवर सालगड्याच्या अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार करणाऱ्या आराेपीच्या मुसक्या लातूरमधून रात्री औसा पाेलिसांनी आवळल्या. अटक केलेल्या आराेपीचे नाव मनोहर उर्फ मनोज देविदास राठोड (वय ३३) असे आहे. त्याला औसा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पाेलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील एका गावातील शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या भावजीकडे अल्पवयीन मेहुणी आली होती. दरम्यान, आरोपीने पीडित मुलीशी जवळीक साधत सतत जबरदस्तीने अत्याचार केले. ज्यात पीडित मुलगी ही सहा महिन्यांची गर्भवती आहे. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल हाेताच आराेपी हा पसार झाला हाेता. त्याला पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्यासह तीन पथके मागावर हाेती. आरोपी आपल्या कुटुंबासह राहते घर बदलून दुसरीकडे राहण्यासाठी गेला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी सापळा लावला. या सापळ्यात आराेपी अलगदपणे अडकला. लातूर शहरातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
औसा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, असे औशाचे डीवायएसपी कुमार चौधरी म्हणाले. ही कारवाई पो.नि.सुनील रेजितवाड, सपोनि.प्रमोद बोंडले, अंमलदार रामकृष्ण गुट्टे, मारुती घुले, राठोड, भंडे, चव्हाण, गोमारे यांच्या पथकाने केली.