रेणापूर (जि. लातूर) : मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून सरकारने ओबीसींचे आरक्षण संपविले आहे. आता ओबीसींच्या आरक्षणाचं कसं, अशी चिंता व्यक्त करत व घोषणा देत रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव कराड (वय ३५) यांनी बुधवारी सायंकाळी मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे. त्याने ओबीसींच्या आरक्षणाबाबत चिंता व्यक्त करणारी चिठ्ठीदेखील लिहून ठेवली आहे.
वांगदरी येथील भरत महादेव कराड ऑटोचालक म्हणून काम करत होते. त्याचबरोबर ते काही वर्षांपासून ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात प्रत्येक आंदोलनात सक्रिय भाग घेत होते. नुकतेच सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून ओबीसींचे आरक्षण कायमस्वरूपी संपविले आहे. मी वेळोवेळी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता. तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करून ओबीसींविरोधी जीआर काढल्यामुळे मी माझे जीवन कायमस्वरूपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला व ओबीसी समाजाला न्याय मिळावा, असा मजकूर त्यांनी चिठ्ठीत लिहून मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. भरत कराड यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्याकडे २ गुंठे जमीन असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, गुरुवारी दुपारी २ वाजता वांगदरी येथे कराड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रशांत थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम उपस्थित होते.
तरुणांनी वाचविण्याचा प्रयत्न केलावांगदरी शिवारातील मांजरा नदीपात्रात बुधवारी भरतने घोषणा देत नदीत उडी मारली. त्यावेळी काही तरुणांनी नदीपात्रात उड्या मारून वाचविण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही.
अंत्यसंस्काराच्या वेळी घोषणाबाजीभरत कराड यांच्या अंत्यविधीच्या वेळी गाव व परिसरातील नागरिकांनी ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे, भरत कराड यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशा घोषणा दिल्या.
आत्महत्येपूर्वी भरत यांचे दोघांशी झाले बोलणेभरत कराड हा सायंकाळी सातच्या सुमारास मांजरा नदीवरील पुलावर गेला. यावेळी मांजरा नदीवर अविनाश गंभीरे व अंतराम मुंडे हे दोघेजण उभे होते. भरत त्यांच्या जवळून जात असताना मी शहीद होणार आहे, असे म्हणून पुढे गेला. त्यांनी खरोखरच नदीपात्रात उडी घेतली. या दोघांनी भरतला उडी मारल्याचे पाहिले, असे सांगितले.