लातूर : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील शेतकरी व व्यावसायिक श्रीकर त्र्यंबकराव फड यांच्या व्यावसायिक जागेतील ३३ केव्ही लाइन स्थलांतरित करण्याचे काम पैसे घेऊन महावितरणने अर्धवट सोडले. ज्या अधिकाऱ्यांनी हे काम अर्धवट केले आहे, त्यांच्याकडून पैसे वसूल करावेत या मागणीसाठी सदर व्यावसायिकाने लातूर येथील महावितरण कार्यालयाच्या मुख्य अभियंत्याच्या दालनात सोमवारी (दि. २७) स्वत:ला कोंडून घेतले. उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दालन उघडण्याची विनंती केली. मात्र, न उघडल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून दरवाजा तोडून व्यावसायिकाला बाहेर काढले.
श्रीकर फड यांच्या पूस येथील व्यावसायिक जागेतून ३३ केव्ही लाइन स्थलांतरित करण्यासाठी महावितरणकडे त्यांनी पैसे दिले होते. परंतु संबंधित अधिकारी व कंत्राटदाराने काम अर्धवट सोडले. अतिरिक्त पैसे घेऊन भ्रष्टाचार केला, असा श्रीकर फड यांचा आरोप आहे. अतिरिक्त पैसे संबंधितांकडून वसूल करावेत, अशी मागणी त्यांची महावितरणकडे होती. या मागणीची पूर्तता होत नसल्याने सोमवारी ५ वाजण्याच्या सुमारास महावितरणचे तीन जिल्ह्यांचे लातूर एमआयडीसी येथील कार्यालय गाठले. मुख्य अभियंत्याच्या दालनात प्रवेश करून आतून कडी लावून घेतली. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विनंती केली. परंतु बाहेर येण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनीही प्रारंभी श्रीकर फड यांना दार उघडण्याची विनंती केली. परंतु त्यांनी दार उघडले नाही. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी दार तोडून त्यांना ताब्यात घेतले.
मुख्यमंत्र्यांनाही पाठविले होते पत्र...व्यावसायिक तथा शेतकरी श्रीकर फड यांनी महावितरण आणि कंत्राटदाराच्या त्रासाला कंटाळून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले होते. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू, असा इशारा देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.
तक्रारीनंतर कारवाई...पूस येथील व्यावसायिक श्रीकर फड यांनी महावितरणच्या कार्यालयात स्वत:ला काेंडून घेतल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी एमआयडीसी पाेलिसांनी धाव घेत फड यांना ताब्यात घेतले असून, महावितरणच्या वतीने देण्यात येणाऱ्या तक्रारीनंतर कारवाई केली जाईल. - समाधन चवरे, पाेलिस निरीक्षक, लातूर
Web Summary : Frustrated with incomplete MSEDCL work despite payment, a businessman locked himself in the Latur office demanding action. Police intervened, breaking the door and taking him into custody after failed negotiation attempts.
Web Summary : पैसे देने के बाद भी MSEDCL का काम अधूरा रहने से नाराज़ व्यवसायी ने कार्रवाई की मांग करते हुए खुद को लातूर कार्यालय में बंद कर लिया। पुलिस ने हस्तक्षेप कर दरवाजा तोड़ा और उसे हिरासत में लिया।