राजकुमार जाेंधळे, महेश पाळणे, लातूर: पाकिस्तानला नमवून हिट झालेल्या लातूरच्या ज्योती पवारच्या खेळीने अजून एक सुखद धक्का देत भारताला आशियाई स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावून दिले. तर लातूरची उत्कृष्ट धनुर्धर वैष्णवी पवारनेही मैदान मारत उझबेकिस्तान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निशाणा साधला आहे. एकंदरित, लातूरच्या या दोन्ही लेकींनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपला दबदबा दाखवून दिला आहे.
थायलंड येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लातूरच्या बेसबॉलपटू ज्योती पवारने उत्कृष्ट खेळी करीत भारताला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचविले होते. मात्र, अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र, तिची खेळी या स्पर्धेत निर्णायक ठरली. विशेषत: पाकिस्तानला हरवत तिने सर्वांची मने जिंकली. उपांत्य सामन्यात थायलंडला ६-५ ने हरवीत भारताने अंतिम फेरी गाठली होती. यात ज्योती पवारचे दोन रण महत्त्वाचे होते. अंतिम सामन्यातही एक रण करीत तिने संघाला बळ दिले. मात्र, या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत तिचे उत्कृष्ट कलेक्शन, फिल्डिंग, पिचिंग महत्त्वाचे ठरले. तिला प्रशिक्षक दैवशाला जगदाळे, प्रा. अनिरुद्ध बिराजदार, प्रा. रत्नराणी कोळी, जिल्हा सचिव रवींद्र गुडे यांचे मार्गदर्शन लाभले. एकंदरित, लातूरच्या या दोन्ही लेकींनी क्रीडा क्षेत्रात डंका वाजविला असून, लातूरचे नाव यशोशिखरावर नेले आहे.
वैष्णवीचा अजून एक निशाणा...
राष्ट्रीय स्पर्धेतील निशाण्याने ‘खेलो इंडिया’चे लक्ष्य गाठणाऱ्या उदगीर तालुक्यातील मलकापूरच्या वैष्णवी पवारने अजून एक टप्पा गाठला असून, उझबेकिस्तान येथे १५ ते २० मे दरम्यान होणाऱ्या अल्फोमिश बार्चिनॉय आंतरराष्ट्रीय सबज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेसाठी तिची भारतीय संघाच्या रिकर्व्ह गटात निवड झाली आहे. सबज्युनिअर नॅशनल स्पर्धेत तिने वैयक्तिक गटात कांस्यपदक पटकाविले होते. तसेच ओव्हर ऑल गटात सुवर्णपदक पटकाविले होते. मंगळवारी आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने तिला निवडीचे पत्र मिळाले आहे. तिला प्रशिक्षक सुधीर पाटील, सुषमा पवार, प्रा. रणजीत चामले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुनील साखरे, सचिव अशोक जंगमे यांनी कौतुक केले आहे.