लातूर : घरफाेडी करणाऱ्या टाेळीतील एकाच्या साेमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १ लाख ५ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. चाैकशीमध्ये दाेन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
पाेलिसांनी सांगितले, मुरुड येथे रात्री एक घर फाेडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली हाेती. या गुन्ह्यातील आराेपीला अटक करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिले. स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने चाेरट्याचा माग काढला असता, रात्रीच्या वेळी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून दागिने चोरणाऱ्या टाेळीची माहिती बखऱ्याकडून मिळाली. याची पडताळणी करून स्थागुशाने लातुरातील पीव्हीआर परिसरात एकाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेत अधिक चाैकशी केली असता, लक्ष्मण अशोक पवार (वय २५, रा. भोसा, ता. जि. लातूर) असे नाव सांगितले. मुरुड येथील घरफाेडीची त्याने कबुली दिली. ही घरफाेडी त्याने इतर साथीदाराच्या मदतीने केल्याचे सांगितले. त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. मुरुड ठाण्याच्या हद्दीतील दाेन चाेरीचे गुन्हे उघड झाले आहेत.
ही कारवाई स्थागुशाचे पो. नि. सुधाकर बावकर, पोउपनि. राजाभाऊ घाडगे, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, राजेश कंचे, गणेश साठे, गोविंद भोसले, श्रीनिवास जांभळे यांच्या पथकाने केली आहे.