औसा (जि. लातूर) : पत्नीवर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्यासाठी लागणाऱ्या पैशांची तडजोड करण्यासाठी पाहुण्यांकडे दुचाकीवरून जाणाऱ्या पतीचा बुधवारी दुपारी औसा-उमरगा मार्गावरील वाघोली पाटीवर विचित्र अपघातात मृत्यू झाला.
रमजान महंमद ताहेर कुरेशी (वय ५०, रा. सास्तूर) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, मयत रमजान कुरेशी हे दुचाकी (एमएच २४, एपी ८३४६) वरून औशातील मामाकडे येत होते. तेव्हा औसा- उमरगा मार्गावरील वाघोली पाटीदरम्यान पाठीमागून येणाऱ्या कार (एमएच १२, आरवाय १३१५) ने दुचाकीला धडक दिली. त्याचवेळी लामजन्याकडे जाणाऱ्या ट्रक (एमएच ४२, टी ५९७२) च्या चाकाखाली तो दुचाकीसह पडला. या अपघातात रमजान कुरेशी ठार झाला. या प्रकरणी किल्लारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ट्रक व दुचाकी किल्लारी पोलिसांनी ठाण्यात आणून लावल्याचे बिट अंमलदार कमाल शेख यांनी सांगितले.