अहमदपूर : लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळास मोठा फटका बसला आहे. मात्र, अहमदपूर आगारातील लालपरीने माल वाहतुकीतून एक महिन्यात ३ लाख ५४ हजार ५९० रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. ४७ फेऱ्यांद्वारे ७ हजार २० किमी धावत ही कमाई केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवाहन महामंडळाची मालवाहतुकीची वैशिष्ट्य म्हणजे, तत्काळ सेवा, वेळेवर वितरण, सुरक्षित व किफायतशीर सेवा व पारदर्शक आर्थिक व्यवहार अशी आहे. थाेडक्या कालावधीत एसटीच्या मालवाहतुकीसाठी शेतकरी, व्यावसायिक, आडते, किराणा व्यापारी पसंती देत आहेत. गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट सुरू असून, एसटीच्या प्रवासी फेऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे, अशा परिस्थितीत मालवाहतुकीतून एसटीला थोडेफार उत्पन्न मिळत आहे.
अहमदपूर आगारातून २१ मे, २०२० मध्ये चार एसटी मालवाहतूक वाहनाद्वारे वाहतुकीला सुरुवात केली. या मालवाहतुकीचे महाकार्गो असे ब्रँडिंग करीत मालवाहतूक सेवा देत आहे. ४९ रुपये प्रति किमीप्रमाणेेे अहमदपूर आगारातून चार मालवाहतूक बसेस सेवा देत आहेत. आवश्यकता भासल्यास इतर आगाराकडून मालवाहतूक बसेस मागविल्या जातात. या मालवाहतुकीतून शेतमाल, बांधकाम व किराणा साहित्य, उद्योगाचा कच्चा माल व इतर वस्तूंची वाहतूक केली जात आहे. १ ते ३१ मे या ३१ दिवसांत अहमदपूर आगाराने ४७ फेऱ्यांद्वारे ७ हजार २० किमीतून ३ लाख ५४ हजार ५९० रुपये उत्पन्न मिळविले आहे. कोरोना काळातील नुकसान भरून काढण्यास थोडा-फार हातभार लागला आहे.
मालवाहतुकीमुळे एसटील मदत...
एसटी बसेसच्या मालवाहतूक सेवेतून जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर विविध प्रकारचे धान्य, किराणा माल, डाळी, प्लास्टीक वस्तू, बी-बियाणे, औषधी, बांधकाम साहित्य, उद्योगासाठीचा कच्चे साहित्य, खतांची वाहतूक केली जाते. अहमदपूर आगारातून २१ मे, २०२० रोजी चार मालवाहतूूक वाहनाद्वारे ही सेवा सुरू झाली. ग्रामीण भागात ही सेवा अत्यंत लोकप्रिय झाली. फारच कमी दिवसांत राज्य परिवहन मालवाहतूक सेवा लोकप्रिय झाली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागातील २५ टक्के मालवाहतुकीची कामे राज्य परिवहन महामंडळास मिळणार आहेत.
- एस.जी. सोनवणे, आगारप्रमुख.