कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उदगीर शहर व परिसरात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत होती. कोविड संशयित रुग्णांचे स्वॅब आरटीपीआर तपासणीसाठी लातूरला पाठवावे लागत होते. त्याचा तपासणी अहवाल येण्यासाठी दोन- दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. त्यानंतर रुग्णांवर उपचार सुरू करावे लागत होते. उदगीर येथे आरटीपीसीआर तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत होती.
उदगीर, जळकोट, देवणी, अहमदपूरसह नांदेड जिल्ह्यातील मुखेड, मुक्रमाबाद भागासह शेजारच्या कर्नाटक राज्यातील सीमा भागातील काही रुग्ण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत होते. ॲंटिजन तपासणी उदगीरात करण्यात येत होती. परंतु, आरटीपीसीआर तपासणीसाठी रुग्णांचे स्वॅब घेऊन लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येत होते. संपूर्ण जिल्ह्यातून स्वॅबचे नमुने लातूरला येत असल्याने अहवालाची प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे पालकमंत्री अमित देशमुख यांनी उदगीर येथे आरटीपीसीआर तपासणीची प्रयोगशाळा मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रस्ताव तयार करून पाठविल्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पाठपुरावा करून अखेर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात प्रयोगशाळा मंजूर करून घेतल्याचे पत्र १७ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानकडून आल्याचे उदगीर येथील सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. डी. व्ही. पवार यांनी सांगितले.
१ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर...
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख म्हणाले, आरटीपीसीआर तपासणीची प्रयोगशाळा मंजुरीसाठी पालकमंत्री अमित देशमुख यांनी विशेष लक्ष देऊन मंजुरी आणली. त्यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सतत पाठपुरावा केला. जिल्हा नियोजन समितीतून १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चार दिवसांत प्रत्यक्षात तपासण्या सुरू होतील. त्यासाठी तांत्रिक सहाय्य विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील डॉ. विजय चिंचोलकर यांनी केले. त्यामुळे रुग्णांना त्वरित अहवाल मिळून उपचारास मदत होणार आहे.