येरोळ : येरोळ व परिसरात पावसाने १०-१२ दिवसांपासून दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. त्यांची पिके उगवली असून, पाऊस नसल्याने कोवळी पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे तुषार सिंचनाद्वारे पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरात मृगात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. महागामोलाचे बी-बियाणे, खते खरेदी करून खरिपाच्या पेरण्या उरकल्या. दरम्यान, पिके उगवण्यास सुरुवात झाली. मात्र, दहा-बारा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने कोवळी पिके सुकू लागली आहेत. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल म्हणून उपलब्ध जमिनीतील ओलीवर पेरणी केली. पावसाने उघडीप दिल्याने अंकुर फुटण्याअगोदरच बियाणे जमिनीत करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
काही शेतकरी शेतातील विहीर, बोअरच्या उपलब्ध पाण्यावर सिंचनाद्वारे पाणी देऊन कोवळी पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. येत्या आठ दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येते की काय, अशी भीती वाढली आहे. खरिपातील पिके उगवली असून, पाऊस मात्र गायब झाला आहे. पीकवाढीसाठी पावसाची नितांत गरज आहे, असे येथील शेतकरी सतीश साकोळकर यांनी सांगितले.