लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कृषी विभागाच्यावतीने ५ लाख ९३ हजार हेक्टर ५९० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित आहे. यामध्ये सर्वाधिक ४ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. यासोबतच रासायनिक खतांची १ लाख ५८ हजार मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली असून, आतापर्यंत ९६ हजार ८८० मेट्रिक टन आवंटन प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कापूस, उडीद आणि मूग ही प्रमुख पिके आहेत. खरीप हंगामासाठी क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये ४ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीन, ९० हजार हेक्टरवर तूर, १७ हजार हेक्टरवर खरीप ज्वारी, ८ हजार हेक्टरवर कापूस, ९ हजार २०० हेक्टरवर उडीद, ११ हजार हेक्टरवर मूग तर ८ हजार ३९० हेक्टरवर इतर पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ६ लाख १६ हजार ८१३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्या अनुषंगाने खते, बियाणांचे नियोजन पूर्ण झाले आहे. यंदा हवामान विभागाने मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार शेतकरीही मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. कृषी विभागाच्यावतीने तालुकानिहाय नियोजन करण्यात आले असून, बियाणे, खतांच्या नियंत्रणासाठी तालुका स्तरावर भरारी पथकांची नियुक्तीही करण्यात आली आहे, तसेच जिल्हा स्तरावर तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
१ लाख ५८ हजार मेट्रिक टन खताची गरज...
खरीप हंगामासाठी १ लाख ५८ हजार ८०० मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज आहे. यामध्ये युरिया ३४ हजार, डीएपी ४० हजार, एमओपी ७ हजार, एसएसपी २० हजार, एनपीके ५६ हजार ८०० या खतांचा समावेश आहे. आतापर्यंत ९६ हजार ८८० मेट्रिक टन मंजूर झाले आहे. त्यापैकी २५ हजार मेट्रिक टन प्राप्त झाले आहे. तर सध्या तालुकानिहाय ५३ हजार ५४० मेट्रिक टन खत शिल्लक आहे.
१ लाख २५ हजार क्विंटल बियाणाची आवश्यकता...
खरिपासाठी १ लाख २५ हजार ५० क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. त्यानुसार बियाणाची मागणी करण्यात आली आहे. सध्या ३४ हजार २०५ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, ज्वारी, मका, भुईमूग, कापूस, तीळ आदी बियाणांचा समावेश आहे. सर्वाधिक १ लाख १८ हजार १२४ क्विंटल सोयाबीन बियाणाची मागणी नाेंदविण्यात आली आहे. यामध्ये महाबीजकडून मागणीनुसार पुरवठा झाला असून, उर्वरित बियाणे लवकरच मिळणार आहेत.
कृषी विभागाची तयारी पूर्ण...
खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्यावतीने पेरणी क्षेत्र, बियाणे, रासायनिक खतांचे नियोजन करण्यात आले आहेत; तसेच खते आणि बियाणांच्या नियंत्रणासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, अधिकच्या दराने बियाणे आणि खतांची विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा. - दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.