उदगीर : शहरात मागील काही वर्षांपासून अटल अमृत योजनेच्या नावाखाली अंतर्गत रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्याचे काम चार वर्षांपासून चालूच आहे. त्यामुळे शहरातील रस्त्याची चाळणी झाली असून, कासवगतीने सुरु असलेल्या या कामाकडे नगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरातील सर्वच भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, नाराजी व्यक्त होत आहे.
उदगीर शहराचा झालेला भौतिक विकास पाहता मागील पाच वर्षांपूर्वी शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते अत्यंत दर्जेदार व चांगल्या पद्धतीचे सिमेंटचे तयार करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. शहरातील नागरिकांसाठी अटल अमृत योजना मंजूर झाली. तसे उदगीर शहराचे अंतर्गत रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले. लिंबोटीच्या धरणापासून सुरू झालेले हे काम शहराच्या जवळ आल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्र तसेच पाणीपुरवठ्याच्या टाक्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शहरातील अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करायला पाहिजे होते; परंतु तसे न करता अगोदर शहरातील रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्याचे काम चालू केले. पाईपलाईन टाकून लगेच त्या ठिकाणी दबाई करून रस्ता पूर्ववत करण्याची तरतूद असताना ठेकेदाराने मात्र खड्डे पाडून ठेवले आहेत. शहरातील काही भागात तर एक महिना रस्ते खोदून पाईप नसल्यामुळे तसेच ठेवण्यात आले. या प्रकाराचा शहरातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. गल्लीतून येणाऱ्या नागरिकांना पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमधून अंदाज बांधून दुचाकी काढाव्या लागत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून रस्ताच खड्ड्यात गेल्याचे चित्र आहे. शहरातील विविध भागात अमृत योजनेसाठी ११८ किलोमीटरचे रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्याचे काम मागील चार वर्षांपासून चालू आहे. निविदा ज्यावेळी मंजूर झाली त्यावेळी दीड वर्षामध्ये रस्ते तयार करून देणे अपेक्षित होते; मात्र कोरोनामुळे या कामास मुदतवाढ मिळाली. चालू वर्षातील ३० सप्टेंबरपर्यंत शहरातील सर्व रस्ते तयार करून देण्याची मुदत आहे, परंतु ज्या वेगाने काम चालू आहे ते पाहता किमान एक वर्ष तरी शहरातील अंतर्गत रस्ते तयार होणार नाहीत असे दिसत आहे.
शहरातील अनेक भागात कामे अर्धवट...
विद्यमान सत्ताधाऱ्यांनी मागील काळात झालेली दर्जेदार रस्त्यांची कामे फोडून आता नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरु केले आहे, परंतु शहरातील अनेक भागात अर्धवट कामे केलेली आहेत. संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाची कामे केली असल्यामुळे सभागृहात वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. ठेकेदार सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून आपले काम रेटून नेत आहे.
-मंजूरखाँ पठाण, गटनेता काँग्रेस
मुदतवाढ देऊनही कामे रखडली...
ठेकेदाराने शहरातील अंतर्गत रस्त्याचे काम करण्यासाठी दुसऱ्या ठेकेदारास दिले होते. तो ठेकेदार काम व्यवस्थित करत नसल्यामुळे आम्ही ते काम थांबवले आहे. कोरोना काळ व इतर स्थानिक अडचणीमुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. या ठेकेदाराला शासनाकडून वेळोवेळी मुदतवाढ देऊनसुद्धा काम वेळेवर होऊ शकले नाही.. ३० सप्टेंबरनंतर कामाच्या बाबतीत मुदतवाढ मिळणार नसल्याचे ठेकेदाराला सूचित करण्यात आले आहे. - मनोज पुदाले, पाणीपुरवठा सभापती