लातूर : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आज, बुधवारी घरीच काळ्या फिती लावून, घरावर काळा झेंडा लावून केंद्र शासनाचा निषेध केला जाणार आहे. केंद्र शासनाने केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विराेधात हे अभिनव आंदोलन केले जाणार आहे.
शेतकरी, उत्पादने, व्यापार व वाणिज्य कायदा २०२०, शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत, आश्वासन आणि कृषी करार कायदा २०२०, अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा २०२० या तीन कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी एकवटला आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी घरीच राहून शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ केंद्र सरकारच्या विरोधात सहभाग नोंदवावा, असे आवाहन किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने महापौर विक्रांत गोजमगुंडे, कॉ. मुर्गाप्पा खुमसे, कॉ. सुधाकर शिंदे, ॲड. उदय गवारे, डॉ. संजय मोरे, ॲड. विजय जाधव, कॉ. डी. पी. कांबळे, कॉ. सुरेश कातळे, किरण जाधव, प्रताप भोसले, युवराज धसवाडीकर, मकरंद सावे, राजकुमार होळीकर, नामदेव चाळक, सतीश देशमुख, धर्मराज पाटील, गाेविंद शिरसाट, प्रेमगीर गिरी, प्रा. अर्जुन जाधव, संदीपान बडगगिरे, माधव बावगे, भालचंद्र कवठेकर, शैलेश सरवदे, आदींनी केले आहे.