लातूर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी २ हजार ५१८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला ८ हजार ७४५ रुपयांचा कमाल, ७ हजार ५०० रुपये किमान तर ७ हजार ६५० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. दोन दिवसांपूर्वी सोयाबीनचा दर आठ हजारांच्या पुढे सरकला होता. मात्र, आता त्यात घट झाली आहे. शनिवारी लातूर बाजार समितीत गूळ ८१ क्विंटल, गहू १,७०५, हायब्रीड ज्वारी १९, रब्बी ज्वारी ४६१, पिवळी ज्वारी १४, मका ५१, हरभरा २,५०४, तूर १,७४०, मूग ८५ तर ९० क्विंटल करडईची आवक झाली. गुळाला ३,१७५, गहू २,०००, हायब्रीड ज्वारी ९००, रब्बी ज्वारी २,०००, पिवळी ज्वारी २,२००, मका १,५००, हरभरा ४,७००, तूर ६,१८०, मूग ५,७००, करडई ४,८५० तर सोयाबीनला ७,६५० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. सद्यस्थितीत खरीप हंगामातील पिके बहरली असून, कोळपणी तसेच फवारणीची कामे सुरू आहेत. शेतकरी शेतीकामात व्यस्त असल्याने बाजारात शेतमालाची आवक घटली आहे. शनिवारी हरभरा २,५०४ तर तुरीची १,७४० क्विंटलची आवक झाली. सोयाबीनच्या दरात घट झाली आहे. त्या तुलनेत आवकही मंदावली असल्याचे बाजारातील चित्र आहे.
साठा मर्यादेमध्ये वाढ; दर वधारले
केंद्र सरकारने मूग वगळता इतर कडधान्यांवर स्टॉक लिमिट करण्याबाबतच्या अधिसूचनेत बदल केला आहे. त्यामुळे साठा मर्यादेमध्ये वाढ झाली असून, कडधान्याचे दर वधारले आहेत. त्यातच आवक नसल्याने दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने साठा मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.