लातूर : उन्हाळ्याची चाहूल लागताच मिरची, मसाल्याच्या दरांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. गावरान तिखट मिरची २०० रुपयांवर बेडगी अस्सल मिरची ३५० किलोंवर पोहोचली आहे. जिरे, धने, तीळ, खसखस, खोबर, मेथी, हळद, मोहरी, आदी मसाल्याचे पदार्थही महागले आहेत. या महागाईबाबत गृहिणींनी खेद व्यक्त केला आहे.
उन्हाळ्याच्या प्रारंभी मिरची व मसाल्याच्या पदार्थांची विक्री करून तिखट, मसाले तसेच लोणच्यासाठी लागणारा मसाला गृहिणी तयार करून ठेवतात. त्याची खरेदी उन्हाळ्याच्या प्रारंभीच केली जाते. मात्र यंदा उन्हाळ्याची चाहूल लागताच मिरचीसह मसाल्याच्या पदार्थांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गृहिणींनी यंदा हात आखडता घेतला आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा कमी मसाला, तिखट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तिखट मसाल्याच्या पदार्थांमध्येही काटकसर करण्याची वेळ यावर्षी महागाईमुळे गृहिणींवर येऊन ठेपली आहे.
वर्षभरासाठी लागणारे लाल तिखट, काळी मिरची, मसाला तयार करून ठेवला जातो. आंबा, लिंबाचा खार घालण्यासाठीही मसाला तयार करून ठेवला जातो. परंतु, यंदा मिरची व मसाला महागला आहे. कांडपाचाही दर वाढला आहे. गतवर्षी एका किलोसाठी कांडपाला ३५ रुपये लागत होते. यंंदा ४५ रुपये लागत आहेत.
- फरजाना शेख, गृहिणी,लातूर
मिरचीचा दर २०० ते ३५० रुपयांपर्यंत गेला आहे. मसालाही महागला आहे. एका किलोसाठी ४०० ते ५०० रुपये खर्च येतो. वर्षभराचे लाल तिखट, लाल मसाला, काळे तिखट करून ठेवायचे झाल्यास १५०० रुपये खर्च येतो. ही महागाई कंबरडे मोडणारी आहे. वार्षिक किचनचे बजेट कोलमडले आहे.
- मीराबाई शेंडगे, गृहिणी