शिक्षण मिळविण्याचा अधिकार कायद्यानुसार प्रत्येक बालकांना प्राप्त झाला आहे. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातूनच निलंगा मतदारसंघातही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगानेच मतदारसंघा अंतर्गतच्या देवणी तालुक्यासाठी मुलांची स्वतंत्र शासकीय निवासी शाळा उभारली जावी, म्हणून माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी जिल्हाधिका-यांकडे पत्राद्वारे जमीन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली होती. सदर जमीन धनेगाव येथील शासकीय गायरान जमिनीतून देण्यात यावी, असेही सुचविलेले होते. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी धनेगाव येथील २२ हेक्टर १० आर असलेल्या गायरान जमिनीपैकी १ हेक्टर ८० आर जमीन मुलांच्या शासकीय निवासी शाळेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिका-यांनी काढले आहेत.
बांधकामासाठी निधीची मागणी...
देवणी तालुक्यासाठी स्वतंत्र मुलांची शासकीय निवासी शाळा उभारण्याकरिता जमीन उपलब्ध झाली असून या जागेवर लवकरच इमारतीचे बांधकाम सुरु व्हावे, याकरिता आ. निलंगेकर यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी पत्राद्वारे केली असून याबाबत पाठपुरावाही सुरु करण्यात आला आहे. या पाठपुराव्याला लवकरच यश प्राप्त होऊन निधीची तरतूद होऊन इमारत बांधकामास सुरुवात होईल, अशी माहिती माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.