बार्शी रोडवरील पथदिवे पूर्ववत
लातूर : पाच नंबर चौक ते महिला तंत्रनिकेतन या मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद होते. स्थानिक नागरिकांच्या वतीने मनपा प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. त्याची दखल घेत पथदिवे पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, मनपाने मागणीची दखल घेतल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
रिंग रोड परिसरात स्वच्छतेची मागणी
लातूर : शहरातील रेल्वे लाइन समांतर रिंग रोड परिसरात स्वच्छतेची मागणी होत आहे. याच मार्गावर सकाळच्या वेळी भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. अनेक जण उरलेला भाजीपाला जागीच टाकून देत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. मनपाच्या वतीने नियमित संकलन केले जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
खते, बियाणे नियंत्रणासाठी पथक
लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कृषी विभागाच्या वतीने खते आणि बियाणांच्या दरामध्ये सातत्य राखता यावे, यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही जण बियाणे आणि खताची चढ्या दराने विक्री करतात. त्याला आळा घालण्यासाठी नियंत्रक पथके तालुकास्तरावर नियुक्त झाली आहेत. दरम्यान, मागील वर्षी बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीचे संकट काही शेतकऱ्यांवर आले होते.
प्राचार्य गोविंद शिंदे यांचा लातुरात सत्कार
लातूर : जेएसपीएम शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यालय, ज्युनिअर कॉलेज आणि एमसीव्हीसी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी गोविंद शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीचे संस्थाध्यक्ष माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, सचिव प्रतिभाताई पाटील कव्हेकर, उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, संचालक रणजीत पाटील कव्हेकर, समन्वयक संचालक नीळकंठराव पवार, संभाजीराव पाटील, विनोद जाधव, प्राचार्य मनोज गायकवाड, मुख्याध्यापक संजय बिरादार, चंद्रशेखर पाटील, युवराज उफाडे, राजेंद्र अवस्थी, दत्तात्रय गोरे आदींनी कौतुक केले आहे.