'पाणी देणार असाल तर मागे उभे राहतो, अन्यथा बाजूला सारण्याची धमक'

By आशपाक पठाण | Published: September 26, 2023 11:58 PM2023-09-26T23:58:15+5:302023-09-26T23:58:45+5:30

जलसाक्षरता रॅलीचा समारोप : माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

'If you want to give water, stand back, otherwise threaten to move aside' - sambhaji nilangekar | 'पाणी देणार असाल तर मागे उभे राहतो, अन्यथा बाजूला सारण्याची धमक'

'पाणी देणार असाल तर मागे उभे राहतो, अन्यथा बाजूला सारण्याची धमक'

googlenewsNext

लातूर : लातूरच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी राजकारण बाजूला सारून एकत्रित यावे. पाण्यासाठी आपण एकत्र लढलो तर पाणी येईल. यात राजकारण करायचे नाही. जर तुम्ही पाणी देणार असाल तर मागे उभे राहतो, अन्यथा बाजूला करण्याची धमक आपल्यात आहे, असा इशारा विरोधकांना देत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, जोपर्यंत लातूरला पाणी आणणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.

लातूर शहरातील हनुमान चौकात जलसाक्षरता रॅलीचा समारोप मंगळवारी रात्री ९. ३० वाजता झाला. यावेळी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड. बळवंत जाधव, औशाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख, जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे,  भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, ॲड. शैलेश गोजमगुंडे, अरविंद पाटील निलंगेकर, प्रा. प्रेरणा होनराव, किरण उटगे, अजित पाटील कव्हेकर, ॲड. गणेश गोमचाळे यांची उपस्थिती होती. 

यावेळी माजी मंत्री आ. निलंगेकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी विकासासाठी राजकारण न करता एकत्र येतात. त्यामुळे तिथे विकास आहे. पाणी प्रश्नावर मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येण्याची गरज आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी आम्ही मराठवाड्याला देतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. हे गोदावरी खोऱ्यात येणार आहे. त्यामुळे आपल्याला स्वतंत्र योजना आणायला हवी.

एम्स, आयआयटीसाठी जन आंदोलन करणार..
लातूर ही गुणवत्तेची खाण आहे. मेडिकल, इंजिनिअरिंगला सर्वाधिक मुले आपलीच लागतात. याठिकाणी केंद्रीय विद्यापीठासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाय, एम्स, आयआयटीसारख्या संस्था आणण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जन आंदोलन उभे करू. आपल्याकडे पाण्याची टंचाई कायम राहिली तर व्यापाऱ्यांचेे स्थलांतर होईल. आपण सर्वजण मतभेद विसरून एकत्र जाऊ, लातूरच्या पाण्यासाठी जे जे करावे लागेल ते करू. जोपर्यंत हक्काचे पाणी येणार नाही तोपर्यंत थकायचे नाही, असे माजी मंत्री आ. संभाजी पाटील म्हणाले.

नतद्रष्ट अधिकाऱ्यांनी शेरा मारला...
लातूरच्या पाणी योजनेसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र, काही नतद्रष्ट अधिकाऱ्यांनी ही पाणी योजना खर्चिक आहे, असा शेरा मारला; पण पाणी हा नफा, तोट्याचा विषय नाही हे मी देवेंद्रभाऊंना सांगितले. तेव्हा ते म्हणाले किती जरी पैसे लागले तरी लातूरला पाणी आणण्याची जबाबदारी माझी आहे. आता पाण्यासाठी जनरेटा वाढला पाहिजे. जनरेटा वाढला की सरकार इथे येईल. जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही कुणाच्या पाठीशी राहणार नाही, अशी भूमिका जनतेने घ्यायला हवी, असे निलंगेकर म्हणाले.

पाण्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल...

मांजरा, तेरणा व तावरजा प्रकल्पात पाणी आले की, आपल्या घरात पाणी येईल. पाण्यासासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल. मागच्या काळात मराठवाड्याच्या नेतृत्वाला पश्चिम महाराष्ट्रासमोर झुकावे लागले. त्यामुळे पाणी आले नाही. मी निवेदन देत बसणार नाही. शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगणार आहे. यासाठी देवेंद्रजी तयार आहेत, अजितदादांना पटविण्याची जबाबदारी अफसर शेख तुम्ही घ्यावी, असे आ. निलंगेकर यांनी सांगितले.

Web Title: 'If you want to give water, stand back, otherwise threaten to move aside' - sambhaji nilangekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.