पोलिसांनी सांगितले, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास कर्नाटकातील बसवकल्याण येथील शम्मा लक्ष्मण जमादार यांचे पती आजारी असल्याने औसा रोडच्या नंदीस्टॉप येथील एका रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचे एमआरआय काढण्यासाठी अशोक हॉटेल चौक भागात ऑटोरिक्षामध्ये त्यांना नेण्यात आले. तेथून परत त्याच रिक्षात बसून रूग्णासह शम्मा जमादार औसा रोडवरील रूग्णालयात गडबडीत उतरल्या. त्यावेळी त्यांची पर्स ऑटोत विसरली. त्यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे, रोख ४० हजार रूपये होते. त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. ऑटोच्या वर्णनानुसार पोलिसांनी शोध घेतला असता एमएच २४ एफझेड २४९९ हा ऑटो असल्याचे निष्पन्न करून पोलिसांनी चालक मुजफ्फर असगर सय्यद (रा. उस्मानपुरा, लातूर) यांचे भेट घेऊन पर्सबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी ती पर्स जशास तशी परत केली. त्यात रोख रक्कम आणि कागदपत्रेही होती. चालक मुजफ्फर सय्यद यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच सदर महिलेला तिची पर्सही परत करण्यात आली.
सदरील कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संजय पवार, शमशोद्दीन काझी, बालासाहेब मस्के, राजकुमार हणमंते, काकासाहेब बोचरे यांनी केली आहे.
कॅप्शन : रिक्षात विसरलेली ४० हजारांची पर्स परत केल्याच्या प्रमाणिकपणाबद्दल ऑटोचालक मुजफ्फर सय्यद यांचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला.