लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीला चालना मिळावी, यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याअंतर्गत शेतावर, बांधावर फळबाग लागवड, फुलपिके लागवड, नाडेफ कंपोस्ट खत युनिट, गांडूळ खत युनिट, विहीर पुनर्भरण आदी योजनांचा समावेश आहे.
फळबाग योजनेमध्ये सलग लागवडीसाठी आंबा, डाळिंब, सीताफळ, लिंबू, आवळा, चिकू, संत्रा, मोसंबी, चिंच, बांबू, शेवगा या पिकांची लागवड करू शकता. फुल पिकांमध्ये निशिगंध, गुलाब, मोगरा या पिकांकरिता अनुदान देण्यात येणार असून, पात्र लाभार्थी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या नियमाप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्र्यरेषेखालील इतर कुटुंबे, महिलाप्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेले कुटुंब, भू-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी आदींचा समावेश आहे. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी जॉबकार्ड आवश्यक असून, या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
जमीन मर्यादेनुसार शेतकऱ्यांची निवड
कृषी कर्जमाफी योजना २००८ नुसार लहान शेतकरी १ ते २ हेक्टरपर्यंत जमीन असलेले व सीमांत एक हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांची निवड योजनेसाठी करण्यात येते. सहभाग घेण्यासाठी जॉब कार्ड गरजेचे आहे. कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी कार्यालयांत या योजनेची माहिती उपलब्ध असून, फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.