लातूर : कोरोनाच्या संसर्गाने दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासकीय योजनेचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी केल्या आहेत. त्यानुसार लातूर तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजना आणि सखी वन स्टॉप सेंटरच्या संचालकांची बैठक पार पडली. निराधार कुटुंबीयांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीला तहसीलदार स्वप्नील पवार, नायब तहसीलदार राजेश जाधव, बाल संरक्षण अधिकारी सीताराम कांबळे, सखी वन स्टॉप सेंटरच्या समन्वयिका मंगल जाधव-मगर, संगांयो समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील उपस्थित होते. लातूर तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. स्थानिक प्रशासन व गावातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने निराधार, पात्र कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांचा अर्ज भरून कागदपत्रे जमा केली जात आहेत. यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पवार, गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, नायब तहसीलदार राजेश जाधव, श्रावण उगिले, रत्नाकर महामुनी, अमोल देडे, शीतल सुरवसे, धनंजय वैद्य, हरिश बोळंगे, अमोल भिसे, संजय चव्हाण, ॲड. परमेश्वर पवार, रमेश पाटील, आकाश कणसे, आदी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, कोरोनामुळे कुटुंबाचे छत्र हरवलेल्या कुटुंबांना शासनाच्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. निराधार कुटुंबांची माहिती संगांयो समितीकडे कळवावी, असे आवाहनही तहसीलदार स्वप्नील पवार, संगांयो समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले आहे.
निराधार कुटुंबीयांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST