अहमदपूर : तालुक्यातील २४८ अंगणवाड्यांअंतर्गत घरपोच पोषण आहार योजनेअंतर्गत ९ हजार ७७ लाभार्थ्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहार वाटप करण्यात येत आहे.
तालुक्यात २४८ अंगणवाड्या असून एकात्मिक बालविकास विभागाअंतर्गत गरोदर, स्तनदा माता, ६ महिने ते ३ वर्षांतील बालक, तीव्र कमी वजनाच्या बालकांना घरपोच पोषण आहार पुरवठा केला जात आहे. तालुक्यात १५११ गरोदर, स्तनदा माता आहेत. ६ महिने ते ३ वर्षाच्या आतील ६ हजार २९० बालके असून त्यांना घरपोच आहार देण्यात येत आहे. पोषण आहारअंतर्गत गरोदर व स्तनदा मातांना गहू, हरभरा, मसूर डाळ, साखर, मिरची, हळद व मिठाचा पुरवठा होतो, बालकांना गहू, तांदूळ, मसूर डाळ, साखर, मीठ, हळद, मिरची, तर तीव्र व कमी वजनाच्या बालकांना विशेष आहार दिला जातो.
मागील काही वर्षांपासून पोषण आहारामध्ये तेल देण्यात येत होते. मात्र, आता तेलाऐवजी साखरेचे वाटप करण्यात येणार असल्याचे एकात्मिक बालविकास अधिकारी शोभा घोडके यांनी सांगितले.