क्षयरुग्णांना औषधीसोबत सकस आहार; लातूर झेडपीच्या 'अन्नदाता' योजनेची केंद्राने घेतली दखल

By हरी मोकाशे | Published: March 15, 2024 04:49 PM2024-03-15T16:49:38+5:302024-03-15T16:52:20+5:30

१७४ निक्षय मित्रांकडून २०० क्षयरुग्णांना सकस आहार

Healthy diet with medicine for TB patients; Central Health has taken notice of the 'Annadata Scheme' of Latur Zilla Parishad | क्षयरुग्णांना औषधीसोबत सकस आहार; लातूर झेडपीच्या 'अन्नदाता' योजनेची केंद्राने घेतली दखल

क्षयरुग्णांना औषधीसोबत सकस आहार; लातूर झेडपीच्या 'अन्नदाता' योजनेची केंद्राने घेतली दखल

लातूर : क्षयरोग दुरीकरणाअंतर्गत मोफत औषधोपचार मिळत असले तरी गरीबीमुळे बहुतांश रुग्णांना पोषक आहार घेता येत नाही. खाल्लेली औषधी पचत नाही अन् रुग्ण सातत्याने अस्वस्थ होतो. त्यामुळे गरजू क्षयरुग्णांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने अन्नदाता उपक्रम सुरु करण्यात आला. अनोख्या उपक्रमाची थेट केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने दखल घेऊन कौतुक केले आहे. त्यामुळे या मोहिमेस आणखीन बळ मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरुग्णांना शासकीय रुग्णालयात मोफत गोळ्या- औषधी मिळतात. तसेच त्यांना पुरेसा, सकस आणि प्रथिनेयुक्त आहार मिळणे आवश्यक असते. जिल्ह्यात सध्या १९१० क्षयरुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील एक हजारपेक्षा अधिक रुग्णांना सकस आहार मिळत नसल्याने त्यांनी पोषण किट देण्याची मागणी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या वतीने अन्नदाता उपक्रम सुरु करण्यात आला.

सामाजिक बांधिलकीची जपणूक...
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी क्षयरुग्णांच्या सकस आहारासाठी मदतीचे आवाहन करुन सूचना केल्या होत्या. जि.प.चे सीईओ अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेने अन्नदाता उपक्रम हाती घेतला. जि.प.चे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय हे १७५ निक्षय मित्र झाले. १७५ निक्षय मित्रांनी प्रथमत: २०० रुग्णांना सकस आहाराची मदत दिली. या उपक्रमाची केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने दखल घेऊन कौतुक केले आणि अशी चळवळ सर्वत्र सुरु व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद...
क्षयरोग भारत अभियानअंतर्गत क्षयरुग्णांना सकस आहार देण्यासाठी लातुरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेली मदत ही कौतुकास्पद आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदतीचा हात पुढे करावा. त्यातून क्षयरुग्णांना आरोग्यदायी जीवन जगण्यास प्रोत्साहन मिळेल.
- वर्षा ठाकूर- घुगे, जिल्हाधिकारी.

आपणही निक्षय मित्र व्हावे...
जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्षयरुग्णांना पोषक आहार देण्यासाठीचा सहभाग हा मनोबल वाढविणारा आहे. त्यात मी ही निक्षय मित्र झाल्याचा अभिमान आहे. आपणही निक्षय मित्र होऊन मदत द्यावी.
- अनमोल सागर, सीईओ.

मोहिमेस आणखीन बळ...
जिल्ह्यातील क्षयरुग्णांना मोफत उपचाराबरोबर सकस आहार देण्यासाठी जिल्हाधिकारी, सीईओ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. या उपक्रमाची केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने दखल घेतल्याने मोहिमेस आणखी बळ मिळणार आहे. उपक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: Healthy diet with medicine for TB patients; Central Health has taken notice of the 'Annadata Scheme' of Latur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.