पोलिसांनी सांगितले की, औसा शहराच्या पूर्वभागात याकतपूर रस्त्यावर वसलेल्या नवीन वस्तीत पन्हाळगड कॉलनीतील प्रदीप क्षीरसागर यांच्या घरी बुधवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास अज्ञात पाच जण शिरले. तेव्हा क्षीरसागर हे आपल्या खोलीत झोपले होते. चोरटे त्यांच्या खोलीत येऊन कपाट उघडत होते. तेव्हा त्यांना जाग आली. परंतु, तीन हत्यारबंद चोरटे डोक्याजवळ व पायाजवळ उभे असल्याने क्षीरसागर निपचित पडून राहिले. यावेळी चोरट्यांनी क्षीरसागर यांना धमकावत हातातील सोन्यांची अंगठी काढून दे म्हणत डोक्यात व हाता- पायावर काठीने व लोखंडी राॕॅडने मारहाण केली. मारहाण व आरडाओरडीमुळे शेजारच्या खोलीत झोपलेले घरातील अन्य सर्वजण जागी झाले व आरडाओरडीमुळे चोरटे पळून गेले.
दरम्यान, चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु, अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. क्षीरसागर यांनी सदरील घटनेची माहिती औसा पोलिसांना दिली असता पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकूर व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे यांनी रात्री अडीच वाजता घटनास्थळास भेट दिली. नाकाबंदी केली. परंतु, चोरटे पळून गेले. दरम्यान, चोरट्यांनी क्षीरसागर यांच्या घरातून सोन्याचे गंठन, अंगठी अशी विविध चार दागिने (किंमत ९० हजार रुपये) व कपाटातील रोख ४० हजार रुपये असे एकूण एक लाख ३० हजार रुपये पळविले. याचवेळी शेजारील शिवाजी शिंदे यांच्या घरातून सोन्याचे गंठन व अंगठी असा ४५ हजारांचा ऐवजही लांबविला.