कृषी विभागाकडून पीक पाहणी
लातूर : निलंगा तालुक्यातील निलंगा, औराद शहाजानी, कासारशिरसी कृषी मंडळ अंतर्गत खरीप हंगामातील विविध पिकांची पाहणी कृषी अधिकाऱ्यांनी केली. सोयाबीन पीक पेरणीमध्ये बीबीएफचा वापर, पट्टा पद्धत व टोकन पद्धतीने लागवड तसेच रुंद सरी व वरंबावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. नणंद येथे सचिन माधवराव पाटील यांचे दहा एकर क्षेत्रावर रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणी केलेल्या प्लॉटची पाहणी करण्यात आली.
जि. प. तील रिक्त पदे भरण्याची मागणी
लातूर : जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागासह अन्य विभागातील रिक्त पदे तसेच पदवीधर मुख्याध्यापकासह केंद्र प्रमुखांची पदे पदोन्नतीने भरण्याची मागणी लोकाधिकार संघाचे जिल्हा प्रमुख वीरनाथ अंबुलगे यांनी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे करण्यात आली. ऑगस्ट अखेर शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत, असेही निवेदनात म्हटले आहे.
श्री गणेश विद्यालयात कार्यक्रम
लातूर : वासनगाव येथील श्री गणेश विद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक व्यंकट पडिले, संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पाटील, मुख्याध्यापक व्ही.डी. लखनगिरे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व्ही.डी. कांबळे यांनी केले तर आभार श्रीमती वाय.डी. केंद्रे यांनी मानले.
जिल्हा सरचिटणीसपदी ए.व्ही. मुळे
लातूर : ईपीएफ ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या जिल्हा सरचिटणीसपदी ए.व्ही. मुळे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी हंगामी अध्यक्ष म्हणून व्ही.के. सुडके यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी अल्प पेन्शनधारकांच्या वतीने खा. सुधाकर शृंगारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी एम.एम. शेख, पांगारकर, कुमदाळे, थडकर, सुडे, डी.बी. कुलकर्णी उपस्थित होते.