राजकुमार जाेंधळे / अहमदपूर (जि. लातूर) : उदगीरकडून शिरुर ताजबंदकडे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या जीपला रविवारी पकडण्यात आले. यावेळी अहमदपूर पाेलिसांनी १३ लाख ७५ हजारांच्या गुटख्यासह एकाला पकडले. यावेळी जीप, गुटखा पाेलिसांनी जप्त केला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.
पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यातील अवैध व्यवयाविराेधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर येथील पोलिस निरिक्षक बी.डी. भुसनूर यांनी वेगवेगळ्या पथकांची स्थापना केली. अहमदपूर येथील पाेलिस पथकाला गाेपनीय माहिती मिळाली. शिरुर ताजबंद येथून चाेरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पथकातील पोहेकॉ. तानाजी आरदवाड, बबन चपडे, शिवशंकर चोले, प्रकाश भोपळे, हरिप्रसाद कांबळवाड, विशाल मुंडे यांनी शिरूर ताजबंद येथील उदगीर रोडवर असलेल्या उड्डाणपुलाखाली उदगीर येथून शिरूर ताजबंदकडे येणाऱ्या बाेलाेराे जीपला (एम.एच. २४ यू. १७४२) थांबवत झडती घेतली असता, त्यामध्ये गुटख्यासह इतर साहित्य असा १३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल हाती लागला. यावेळी एकाला पकडण्यात आले असून, अहमदपूर पाेलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.