कोविड रुग्ण व नातेवाईकांना मोफत भोजन
लातूर : शहरातील विविध रुग्णालयात कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांसाठी शहरातील विविध सामाजिक संस्थांच्यावतीने मोफत भोजन दिले जात आहे. या उपक्रमामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. सकाळ आणि सायंकाळ अशा दोन वेळेस मोफत भोजनासोबतच शुद्ध पिण्याचे पाणीही उपलब्ध करून दिले जात आहे. कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना हा उपक्रम आधार देणारा ठरत आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याने तापमानात वाढ
लातूर : शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली असून, दुपारच्या वेळी उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिक कुलर, पंख्याचा आधार घेत आहेत. जिल्ह्याचे तापमान ३८ अंशांवर पोहोचले असून, वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
रस्त्यात अडथळा; वाहनधारकांची गैरसोय
लातूर : शहरातील गूळ मार्केट परिसरात रस्त्याच्या मध्यभागी नालीवरील झाकण मोडकळीस आले आहे. त्याच्या बाजूला बॅरिकेट्स लावण्यात आले असले तरी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावर दररोज मोठी वर्दळ असते. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने तत्काळ लक्ष देऊन रस्त्यातील अडथळा दूर करण्याची मागणी होत आहे.
बार्शी रोडवर गतिरोधक बसविण्याची मागणी
लातूर : शहरातील बार्शी रोडवर दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. काही वाहने वेगाने धावतात. परिणामी, दुचाकी चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. गतिरोधक नसल्याने अपघातासह धोका वाढला आहे. विशेष म्हणजे या बार्शी रोडवरील काही सिग्नल बंद आहेत. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका ओळखून संबंधित यंत्रणेने या मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
फळबाजारात टरबुजांची आवक वाढली
लातूर : उन्हाची तीव्रता वाढत असून, रसाळ फळांना नागरिकांकडून मागणी वाढली आहे. शहरातील फळबाजारात टरबूज, खरबूज, आंबे विक्रीसाठी दाखल होत आहेत. सकाळच्या वेळी सौदा होत असून, अनेक व्यापारी गल्लोगल्ली रसाळ फळांची विक्री करीत आहेत. संचारबंदीमुळे फळांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर फळांना मागणी वाढेल, असे सलमान बागवान यांनी सांगितले.
रेणापूर नाका परिसरात स्वच्छतेची मागणी
लातूर : शहरातील रेणापूर नाका परिसरात नियमित घंटागाडी येत नसल्याने रस्त्याच्या कडेला, मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाने याकडे लक्ष देऊन तत्काळ नियमित घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी रेणापूर नाका परिसरातील नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, याबाबत वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली आहेत.
महावितरणच्यावतीने मान्सूनपूर्व कामे
लातूर : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून, महावितरणच्यावतीने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली जात आहेत. नादुरुस्त डीपी दुरुस्त करणे, वाकलेले खांब सरळ करणे, तारांची दुरुस्ती करणे, तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या कापणे यासह विविध कामे पूर्ण केली जात आहेत. मान्सूनपूर्व कामांसाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यामुळे मान्सूनपूर्व कामांना वेग आला असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
महाडीबीटी पोर्टलवर बियाण्यांसाठी अर्ज
लातूर : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजनांअंतर्गत बियाणे घटकांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी बियाणी अनुदानावर उपलब्ध होणार असून, अर्ज करणे बंधनकारक आहे. आपल्याजवळील पीएससी सेंटरवर जाऊन शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
दहावीच्या उन्हाळी वर्गांना सुरुवात
लातूर : नववी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळांच्यावतीने उन्हाळी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, गणित आदी विषयांच्या तासिका ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात वर्ग भरत असून, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शाळांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालकांमधून कौतुक होत आहे.
पावसाळ्यात एक झाड लावा उपक्रम
लातूर : शहरातील वसुंधरा प्रतिष्ठानच्यावतीने वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेतला जात आहे. वृक्ष लागवडीबरोबरच संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने पावसाळ्यात एक झाड लावा हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी समाज माध्यमातून जनजागृती मोहीमही राबविली जात आहे. यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, पावसाळ्यात प्रत्येकाने एक झाड लावावे, असे आवाहनही प्रा. योगेश शर्मा यांनी केले आहे.