शहरातील बाजारात माठ उपलब्ध
लातूर : जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढत असून, दुपारच्या वेळी काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे. उन्हाळ्यात गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ बाजारात दाखल झाले असून, शहरातील गंजगोलाई, गुळ मार्केट, गांधी चौक आदी भागांत कलाकुसर केलेले माठ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. खरेदीला नागरिकांची पसंती दिसून येत असून, उन्हाचा पारा वाढेल तसा माठ खरेदीकडे अधिक कल वाढत जाणार आहे.
भगतसिंग विद्यालयात जयंती साजरी
लातूर : रेणापूर तालुक्यातील पळशी येथील भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजाभाऊ रामचंद्र राठोड यांनी राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आर. के. जाधव, संस्था सचिव रामदास नारायण जाधव आदींसह मुख्याध्यापक, शिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी आर. के. गायकवाड यांची इतिहास परिषदेवर निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
खाद्य तेलाचे दर वाढल्याने बजेट कोलमडले
लातूर : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाचे दर वाढत आहेत. यासोबतच तूरडाळही महागली आहे. भाजीपाला स्वस्त असला तरी खाद्यतेलाला मागणी अधिक आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरातही वाढ झाली आहे. सोयाबीन तेल १२५, सूर्यफुल १३५ ते १३८, शेंगदाणा १५५ ते १६०, तर पामतेल ११० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर
लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत २३ हजार ६०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या होमआयसोलेशनमध्ये १३०हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. गृहविलगीकरणासाठी आरोग्य विभागाच्या वतीने स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच या रुग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने विशेष लक्ष ठेवले जाते. जिल्ह्यात दररोज एक हजारांहून अधिक व्यक्तींच्या चाचण्या केल्या जात आहेत. तसेच बाधितांच्या संपर्कातील व्यक्तिंचा शोध घेण्यावर आरोग्य विभागाचा भर आहे.
बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन
लातूर : महापुरुषांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, औसा शाखेच्या वतीने औसा टी पॉईंट तेथे १७ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजल्यापासून शिबिरास प्रारंभ होणार असून, रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन व्यंकटराव काकडे, नीळकंठ हेंबाडे, नरेश थोरमोटे, स्वरूपकुमार सूर्यवंशी, नंदकिशोर कांबळे, संदीप पंतोजी, महादेव गरड आदींनी केले आहे.
सॅनिटायझर स्टँड व मास्कचे वाटप
लातूर : शहरातील राही फाऊंडेशनच्या वतीने पटेल नगर येथील राजर्षी शाहू विद्यालयात ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना सॅनिटायझर स्टँड व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका पवार, जाधव, एस. व्ही. नागुरे, दीपक बजाज, शैलेश कानडे, पी. पी. झुंजे, व्ही. व्ही. कुंभार, नागेश सुगरे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन बेलुरे यांनी केले. तोडकर यांनी आभार मानले.
संविधान स्तंभ उभारण्याची मागणी
लातूर : समता, न्याय, बंधुता या तत्त्वांची विचारसरणी असणारे भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रत्येक भारतीयामध्ये रुजावे, यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान स्तंभ उभारावा, अशी मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हा महासचिव शीलरत्न गायकवाड यांची स्वाक्षरी आहे. या मागणीची तत्काळ अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात अभिवादन
लातूर : तालुक्यातील मळवटी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक युवराज शिंदे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मधुकर गरड, उमाकांत धोंडजी, सुहास माकणीकर, जाफर अली सय्यद, श्रीकृष्ण पवार, विलास गिरी, मंजुषा शिंदे, चंद्रकांत चोपले, बिटाजी भोसले, सुनील आगलावे आदींसह शिक्षक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
अमोल स्वामी यांचा पुरस्काराने गौरव
लातूर : येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल सुनील स्वामी यांचा युवा मानकरी समाजरत्न पुरस्काराने कोल्हापूर येथे गौरव करण्यात आला. यावेळी ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज, नीळकंठ शिवाचार्य महाराज, डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, सभापती संजय केनेकर, अशोक स्वामी, दिलीप स्वामी, सुधीर स्वामी, अलका स्वामी, सोनाली स्वामी, अनिल सोलापुरे, नंदकुमार जंगम, विजय जंगम, वैजनाथ स्वामी, संतोष स्वामी, संजय मनूरकर आदींची उपस्थिती होती.
वीज ग्राहकांनी थकीत बिलाचा भरणा करावा
लातूर : लातूर परिमंडलात पावणेदहा लाख वीज ग्राहकांकडे ५ हजार कोटींची थकबाकी आहे. महावितरणच्या वतीने वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. वाणिज्यिक, औद्योगिक, घरगुती, कृषी पंपधारकांकडे ही थकबाकी आहे. बिलासह थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या वतीने जनजागृती मोहीमही राबविली जात आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील वीज ग्राहकांनी आपल्या थकीत वीज बिलांचा तत्काळ भरणा करावा, असे आवाहन लातूर परिमंडलाच्या मुख्य अभियंत्यांनी केले आहे.