कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, दर शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन करण्यात येत आहे. मात्र, काहीजण विनाकारण फिरत असल्याचे आढळून येत आहे. अशा व्यक्तींना रोखण्यासाठी सुरुवातीस दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर कोविड चाचणी करण्यात येत होती.
दरम्यान, रविवारी शहरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काहीजण विनाकारण फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे उदगीर शहर पोलिसांनी त्यांची प्रथम चौकशी केली. समाधानकारक उत्तर नाही मिळाल्यास अशा नागरिकांचा पुष्पहार घालून सत्कार करीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील, पोलीस उपनिरीक्षक सहदेव खेडकर, पोलीस उपनिरीक्षक देवानंद फडेवाड, पोलीस कर्मचारी अविनाश फुलारी, बसवेश्वर मोतीपवळे आदींसह गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.